सोलापूर-विजापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा घटनास्थळीच मृत्यू
![सोलापूर-विजापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा घटनास्थळीच मृत्यू](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/accident.jpg)
सोलापूर |
सोलापूर-विजापूर महामार्गावर सोलापूरच्या अलीकडे तेरा मैलजवळ एक जीप झाडावर आदळून भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये तिघाजणांचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. किशोर आण्णाराव भोसले (वय ४५, सळई मारूती मंदिराजवळ, उत्तर कसबा, सोलापूर), नितीन भगवान भांगे (वय ३२, रा. निराळे वस्ती, मुरारजी पेठ, सोलापूर) आणि व्यंकटेश राम म्हेत्रे (वय ४५, रा. मोदीखाना, सोलापूर) अशी या अपघातातील तिघा मृतांची नावे आहेत. तर राकेश हुच्चे (रा. सोलापूर) हा जखमी झाला.
हे चौघेजण एमएच १३ बीझेड ९९०९ या स्कार्पिओ गाडीतून दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गेले होते. यातील मृत नितीन भांगे हा मंडप कंत्राटदार होता. औराद येथे विद्युत रोषणाईच्या कामासाठी आपल्या सहका-यांना सोबत घेऊन गेला होता. तेथून ते सोलापूरकडे परत येताना विजापूर-सोलापूर महामार्गावर तेरा मैलजवळ रस्त्याच्या कडेला झाडावर गाडी आदळली. मंद्रूप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.