वेळ पडल्यास कठोर निर्बंध लावणार :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
![Strict restrictions will be imposed if time permits: Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/centre_gave_its_share_of_funds_for_covid_infrastructure_says_bharati_pawar.png)
सांगली : संपूर्ण देशात सध्या ओमिक्रानचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांना सतर्क राहण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. वेळ पडल्यास कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज सांगलीचा धावता दौरा केला. कोल्हापूरहून उस्मानाबादला जात असताना त्यांनी सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयास भेट दिली.
पत्रकारांशी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या,‘‘देशात ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य सरकारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळ पडल्यास कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षा लवकर होतो. असे असले तरी तो लवकर बराही होत असल्याचे चित्र आहे. मात्र त्याचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.’’
केंद्राने राज्य सरकारांना दोन पॅकेज मधून विशेष मदत केली आहे. पॅकेजचा निधीही वितरित करण्यात आला आहे. यामधून राज्यांना आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध खरेदी करता येतील. लॉकडाउनचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा आहे. कंटेन्मेंट झोन करणे, कडक नियम लावणे हे सर्व काम राज्य सरकारांनी करायचे आहे. रुग्ण संख्या वाढल्याने गरज पडल्यास लॉकडाउनचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे.
– डॉ.भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री