‘देश सुरक्षित ठेवण्यासाठी महायुतीसोबत राहा’; योगी आदित्यनाथ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Mahayuti-5-780x470.jpg)
कराड : मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील महायुतीला साथ देऊन मनोज घोरपडे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मसूर येथील सभेत केले. मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश, देशाच्या सीमा व धर्म सुरक्षित आहे. ही सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी महायुतीसोबत राहा. असे आवाहनही त्यांनी केले.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते. उमेदवार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे, रामकृष्ण वेताळ, विठ्ठल स्वामी महाराज, सुंदरगिरी महाराज, नीळकंठ धारेश्वर महाराज, सचिन नलवडे, विक्रमबाबा कदम, प्रमोद गायकवाड, सीमा घार्गे, दीपाली खोत, सुनील काटकर, संग्राम घोरपडे, महेशबाबा जाधव, वासुदेव माने, चित्रलेखा माने, संपतराव माने, भीमराव पाटील, विजयागिरी मल्लीग महाराज व मान्यवर उपस्थित होते. योगी आदित्यनाथ म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली देश जोडणारी ताकद काम करत आहे.
हेही वाचा – लातूरमधील एकाधिकारशाही, दहशतीविरुद्ध लढा; डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचा हल्लाबोल!
तर दुसऱ्या बाजूला महाबिघाडी गटबंधन देश तोडण्यासाठी एकत्र आले आहेत. आपण एकत्र राहिलो पाहिजे. राम मंदिरासाठी पाचशे वर्षे वाट बघावी लागली. काशी विश्वेश्वरय्या, मथुराची अवस्था तीच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांचे वैभव असणारे प्रतिके अतिक्रमित झाली, आमच्या गणपती उत्सवावर, राम उत्सवावर दगडफेक होते. त्यामुळे एक राहा. सर्वांनी एक राहिले पाहिजे. आपली ताकद विखुरता कामा नये. देशाला एकजूट करण्याचे काम मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आज नवीन भारत आपल्याला पाहायला मिळतो. आज अतिक्रमण करण्याचे पाकिस्तानचे धाडस आहे का असा सवाल त्यांनी केला. सुशासन, सुरक्षितता, समृद्धी देशात कायमस्वरूपी ठेवण्यासाठी पुन्हा महायुती महाराष्ट्रात व देशात येणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात महाबिघाडी लांब ठेवण्यासाठी महायुतीसोबत राहून मनोज घोरपडेंना विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर व विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कराड उत्तर गेल्या पंचवीस वर्षांपासून परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे. आजूबाजूच्या मतदारसंघाचा विकास झाला. मात्र, कराड उत्तर विकासापासून वंचित आहे. या मतदारसंघाचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मनोज घोरपडे यांनी केले. महायुतीतून कराड उत्तरचा कायापालट करुन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे काम करु,अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दिली.