‘शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकार सकारात्मक; संप करू नये’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sanjay-Raut-12-780x470.jpg)
नागपूर: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केले.
सदस्य कपिल पाटील यांनी याबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
हेही वाचा – मोठी बातमी! संसदेचं कामकाज सुरू असताना २ जण शिरले, एक जण महाराष्ट्रातील
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जुन्या पेन्शन संदर्भात शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने माजी सनदी अधिकारी सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीने आपला अहवाल नुकताच राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालातील शिफारशी व जुन्या पेन्शन संदर्भात विविध शासकीय कर्मचारी संघटनांशी चर्चा केली जाईल.
जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून १४ डिसेंबर पासूनचा शासकीय कर्मचारी संघटनांचा संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.