क्रीडा विश्व: भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी डॉ. गुलजार शेख यांची नियुक्ती
![Sports World, as the coach of the Indian team, Dr. Gulzar Shaikh,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Untitled-design-5-2-780x470.png)
पुणे : दक्षिण कोरिया येथे २ ते ८ एप्रिल २०२३ दरम्यान होणाऱ्या आशियाई महिला सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी डॉ. गुलजार शेख यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबीर यवतमाळ येथे १५ ते २१ मार्च दरम्यान घेण्यात आले होते. यावेळी ही निवड करण्यात आली. यावर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील महिला गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले होते. या संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ. गुलजार शेख यांनी महत्वाची जाबाबदारी सांभाळली होती.
डॉ. गुलजार शेख हे आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रीडा शिक्षक असून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. शेख यांच्या निवडीसाठी सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष व राज्याचे विद्यमान क्रीडामंत्री गिरीश महाजन,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव इरफान शेख, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अण्णा थोरात, सचिव गजानन पंडित यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.