आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाची विशेष सुविधा; भाविकांसाठी थेट गावातून पंढरपूरला लालपरी

मुंबई : राज्यातील विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी! यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भाविकांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे. प्रथमच ४० अथवा त्याहून अधिक भाविकांचा गट तयार झाल्यास, त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला नेणारी एसटी बस ‘लालपरी’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही विशेष सेवा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली असून, भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून ही सेवा बुक करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “आषाढी यात्रेसाठी यंदा ५,२०० विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर येथे राज्यभरातून लाखो भाविक दाखल होतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा थेट गावातून पंढरपूरला जाणारी सेवा उपलब्ध केली आहे.”
हेही वाचा – ‘राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या उपक्रमामुळे भाविकांना पंढरपूर यात्रेसाठी स्वतंत्र वाहतुकीची व्यवस्था करावी लागणार नाही, शिवाय एसटीच्या विश्वासार्ह सेवेचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे, ही सेवा स्वस्तात उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे सामान्य भाविकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्यातील कुठल्याही गावातील ४० अथवा त्यापेक्षा अधिक भाविक एकत्र आले, तर त्यांच्यासाठी गावातून थेट पंढरपूरची एसटी सेवा उपलब्ध होणार असून, ही सुविधा भाविकांसाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.