“अधिवेशनात बोलणारे अडीच-तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले”; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/shrikant-shinde-780x470.jpg)
हे डबल इंजिन सरकार आहे, चांगलं काम करत आहे
मुंबई :
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. सरकार गेल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित लावली. यावेळी त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावरून सत्ताधारी पक्षावर टीका केली. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
चार भिंतींच्या आत बसलो, घरात बसलो तर लोकांच्या भावना कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार? आज अधिवेशनात बोलणारे अडीच-तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला सुनावले आहे.
लोकांच्या, कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर काम करावे लागते . लोकांमध्ये मिसळावे लागते . कार्यकर्त्यांना जपावं लागतं. आत्तापर्यंत अनेक सत्तांतर झाली पण हे सत्तांतर ऐतिहासिक होतं. पन्नास आमदारांसह 13 खासदार का गेले? याचं आत्मपरीक्षण करायला हवं? लोक का चालले आहेत? का चुकतय हे तपासायला हवं? असा सल्ला यावेळी श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
त्याचबरोबर हे डबल इंजिन सरकार आहे, चांगलं काम करत आहे. राज्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा केंद्राची मदत लागेल, तेव्हा केंद्राकडून मदत घेण्याचं मोठ्या मनाने हे सरकार करेल. तुम्ही अडीच वर्ष घरी बसून काम केलं, राज्याला मागे नेलं, असं खासदार श्रीकांतशिंदे म्हणाले.