शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार, शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारणार : माजी आमदार शरद सोनवणे
![Shiv Janmabhoomi Danka will be heard around the world, Shiv Chhatrapati, the world's largest statue, Junnar, will be erected by former MLA, Sharad Sonwane,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Sharad-Sonavane-780x470.png)
पुणे: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला आहे. गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या धर्तीवर शिवरायांचा पुतळा देखी भव्यदिव्य उभारला जाईल. या पुतळ्याची नोंद संपूर्ण जगाला घ्यावी लागणार असून त्यांच्या निर्मितीसाठी शिल्पकार देखील निश्चित करण्यात आले असल्याचे सोनवणे यांनी सांगितलं आहे.
सोमवारी मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे हे भीमाशंकर येथे दर्शनासाठी आले असता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज नागरिकांपर्यंत आपला संकल्प पोहचवण्यासाठी पुतळा उभारणीची माहिती माध्यमांसमोर देत असल्याचे शरद सोनवणे यावेळी म्हणाले. येत्या चार दिवसांत मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळ दिली असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. २९ सप्टेंबर रोजी आणखीन तीन महत्वाच्या घोषणा आणि पुतळा उभारणी कामाचा सविस्तर आराखडा मांडण्यात येईल. २९ सप्टेंबर २०२३ ते २९ सप्टेंबर २०२४ या एक वर्षाच्या दरम्यान शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी पूर्ण करण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शरद सोनवणे यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडिया तसेच फ्लेक्सच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज घोषणेचा एक भाग समोर आणत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. ही घोषणा करतानाच आपल्या संकल्पात शिवरायांचा पुतळा हा एक महत्वाचा भाग असून आणखीन तीन मोठ्या घोषणा 29 सप्टेंबरलाच होणार असल्याचं सोनवणे यांनी सांगितल आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुतळा…
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिटी” प्रमाणे शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी महाराष्ट्रभरातील शिवभक्तांनी घोषवाक्य अर्थात टॅग लाईन ९९६७०१०५०४ या संपर्क क्रमांकावर सुचवण्याची विनंती शरद सोनवणे यांच्याकडून करण्यात आली आहे.