
महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे. विधानसभेला महायुतीने घवघवीत यश मिळवलं. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडीला पन्नाशीचा आकडाही पार करता आला नाही. त्यामुळे मविआचे बहुंताश नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी महायुतीचा पर्याय निवडत आहेत. मागच्या काही महिन्यांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये मविआमधून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच इनकमिंग वाढलं आहे. लवकरच काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसणार आहे.
हेही वाचा – मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी मुदतवाढ, ७ जुलै पर्यंत भरा कर
नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला धक्का बसू शकतो. शरद पवार गटाचे नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपामधून शरद पवार गटात येऊन गणेश गीते यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गणेश गीतेंसोबत काही माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात गणेश गीते यांनी निवडणूक लढवली होती. येत्या दोन दिवसात गणेश गीते आणि समर्थकांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. बऱ्याच वर्षांपासून कुणाल पाटील यांचं कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ होतं. पण आता त्यांनी भाजपची वाट धरली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. धुळे तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी झटका यासाठी आहे, कारण यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह सरपंच, उपसरपंच आणि बाजार कमिटी सभापती, संचालकांचा समावेश आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी कोलमडून पडणार आहे.