काँग्रेससोबतच्या जुन्या आठवणींना शरद पवारांनी दिला उजाळा
![Sharad Pawar brought up old memories with Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/sharad-pawar-780x470.jpg)
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे
तब्बल 19 वर्षांनंतर शरद पवारांची केली काँग्रेस भवनात एन्ट्री
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या काँग्रेस भवनात एन्ट्री केली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या अशी विनंती कॉंग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी केली होती. त्याचाच मान ठेवत शरद पवार यांनी आज तब्बल 19 वर्षांनंतर काँग्रेस भवनमध्ये भेट देत काँग्रेस कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आज देशात काही लोक कॉंग्रेस मुक्त भारत करायच म्हणतात. पण देशात कॉंग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल. आत्ताचे सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करतायत.
मी सर्वात आधी 1958 ला या कॉंग्रेस भवनमधे आलो. आज अनेक वर्षांनी कॉंग्रेस भवनमधे आलोय. त्याकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार देखील या वास्तूतुनच चालायचा. इथुन कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हीन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामधे पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे आहे. कॉंग्रेसने वर्धापन दिनानिमित्त आम्हाला बोलावले याबाबत धन्यवाद, असं शरद पवार यांनी सांगितल.यापुर्वी शरद पवार हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी काँग्रेस भवनमध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते थेट जाहीर सभा घेऊ शकत नव्हते. त्याऐवजी मोठ्या शहरांत त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रितपणे भूमिका मांडण्याचे नियोजन केले होते.