एकाच कुटुंबातील सात जणांना झाडाला हात पाय बांधून बेदम मारहाण; महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना
चंद्रपूर |
चंद्रपुरात जादूटोणा केल्याच्या संशयातून कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी कुटुंबातील सात सदस्यांना झाडाला बांधून मारहाण केली. कुटुंबीयांना भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत गंभीर झालेल्या कुटुंबीयांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द गावात हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. अद्याप पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान या घटनेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हटलं आहे. “पुन्हा अशी हिंमत होऊ नये यासाठी निश्चितच आमच्याकडून प्रयत्न केले जातील. पुढील अधिवेशनात यावर अशा विषयावर सविस्तर चर्चा करू,” असं त्यांनी सांगितलं आहे.