समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावरून शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझरचा भीषण अपघात झाला. क्रूझरला क्रेटाने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालाय. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामधील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर भाविकांच्या भरधाव कुझर गाडीचं टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला. त्यातच पाठीमागून येणाऱ्या क्रेटाने जोरदार धडक दिली. क्रेटाने जोरदार धडक दिल्यामुळे क्रूझर समृद्धी महामार्गावर पलटी झाली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मृतांमध्ये विद्या साबळे व मोतीराम बोरकर यांचा समावेश आहे. कुझर मधील सर्व भाविक यवतमाळ येथून शिर्डी येथे दर्शनासाठी जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. मुंबई कॉरिडॉर वरील चेनेज ३४४.६ वर सकाळी ८.४५ वाजता अपघात झाला. अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.