मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं विधान; म्हणाले..
![Sayaji Shinde said that I support the demand of Maratha reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Sayaji-Shinde-and-Manoj-Jarange-Patil-780x470.jpg)
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यातील अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चादेखील झाली. त्यानंतर माधम्यांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे, असं ते म्हणाले.
सयाजी शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तो आवाज जरांगे पाटील यांनी उठवला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नाही पण आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ‘न भूतो न भविष्यती’ असं कार्य आरंभलं आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी ही भेट घेतली आहे. माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात काही चर्चा झाली नाही. कारण मी काही अभ्यासक नाही. मी फक्त इथे आलो, त्यांना भेटलो आणि चहापाणी घेतलं.
हेही वाचा – ‘७० हजार कोटी खाणारा बंदर मांडीवर जावून बसला आणि पोपट झाला’; काँग्रेस नेत्याचा अजितदादांना खोचक टोला
प्रत्येकाने रस्त्यावर उतरून ओरडलं पाहिजे, असं नसतं. पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं. सत्याच्या बाजूने लोक नेहमीच उभे राहतात. राज्यभरात ५४ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वांचीच परीक्षा सुरू आहे. जरांगे पाटील या परीक्षेत उत्तम आहेत. त्यामुळे राजकारण्यांचीही परीक्षा सुरू आहे. मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुण यांचा विचार केलाच पाहिजे, असं सयाजी शिंदे म्हणाले.