‘श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा’; संजय राऊतांचा आरोप
![Sanjay Raut said that there is a scam of crores through Srikant Shinde Foundation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Sanjay-Raut-and-Shrikant-Shinde-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट करणार अशी मोदींनी २०१४ पासून गॅरंटी घेतली आहे. आता नव्याने गॅरंटी देत आहेत. मागच्या दीड ते दोन वर्षात देशातले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतले. भाजपा हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष बनला. तरीही भ्रष्टाचार संपवू हे तुणतुणं मोदी आणि भाजपाचे लोक वाजवत असल्याचं राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, भारतातला निवडणूक रोखे घोटाळा हा जगातला सर्वात मोठा आणि भयंकर घोटाळा आहे. सरकारचा दबाव, त्यांनी दाखवलेली लालुच, कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारुवाले, औषधं बनवणाऱ्या कंपन्या यांना हजारो कोटींची कामं द्यायची आणि रोखे माध्यमातून पैसे गोळा करायचे आणि आमदार खासदार खरेदी करायचे हा धंदा भाजपाने सुरु केला आहे. कोणत्याही व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाही.
हेही वाचा – ४ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
कोव्हिड काळात सुरु केलेला पीएम केअर फंडचा काहीही हिशोब नाही. तो खासगी ट्र्स्ट आहे पण तो सरकारी असल्याचं दाखवून कोट्यवधींची रक्कम गोळा करण्यात आली. महाराष्ट्रात अशा प्रकारचा एक घोटाळा झाला आहे. ६०० कोटींचा हा घोटाळा झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून आम्ही माहिती घेत आहोत. वकील नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे व्यवहार, आर्थिक उलाढाल काय आहे? याची माहिती मागवली. व्यवहारांवरुन कोट्यवधींची उलाढाल करत आहेत हे लक्षात आलं. त्यांचा वैद्यकीय मदत रुग्ण कक्ष आहे. गणेश उत्सव स्पर्धेत कोट्यवधी रुपये वाटले, गणपतीत ६०० गाड्या बुक करण्यात आल्या त्याचे पैसे कुणी भरले? कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. सरकारचे बाळराजे (श्रीकांत शिंदे) हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून चंदा दो आणि धंदा लो या माध्यमातून काम करत आहेत. यांचं ऑडिट, देणग्या देणाऱ्यांचा तपशील हे सगळं सातपुते यांनी मागितली आहे. मात्र धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत. त्यांना ही माहिती मिळत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या खात्यात गेल्या काही वर्षांमध्ये ४० ते ५० लाखांची उलाढाल झाली आहे पण गेल्या दीड वर्षात त्यातली उलाढाल कोट्यवधींची आहे. हे सगळे पैसे कुठून आले, दानशूर कर्णाचे अवतार कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून बिल्डर्स, कंत्राटदार या सगळ्यांना दिलं जातं आहे. श्रीकांत शिंदेंवर ईडीची कारवाई झाली पाहिजे. हा सगळा पैसा म्हणजे काळा पैसा आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला मिळालेला निधी बेकायदेशीर आहे, असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.