संजय राऊतांना कर्करोगाचं निदान; म्हणाले, “ऐन दिवाळीत किमो घेतला, पाणीही पिता येत नव्हतं!”

Sanjay Raut Cancer : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची धडाडती तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी मोठा आघात झाला होता. २०२५ च्या दिवाळीपासून संजय राऊत माध्यमांसमोर येत नव्हते. त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे वृत्तही आले. पण संजय राऊतांना नेमकं काय झालं होतं? हे कोणालाही समजू शकलेले नव्हते. मात्र, त्या काळात त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं, अशी माहिती आता समोर येत आहे. याबाबत त्यांनीच आता खुलासा केला आहे. एबीपी कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी कर्करोगाचं अचानक निदान झालं. त्याआधी आपण दौरे करतो, प्रवास करतो. कुठेतरी उशिरा पोहोचतो, उशिरा झोपतो म्हणून त्रास झाला असेल, असं आधी मला वाटलेलं. पण माझा भाऊ आमदार सुनिल राऊत याला काय वाटलं कोणास ठावूक, पण त्याने रक्त चेक केलं. तेव्हा निदान झालं की पोटात कॅन्सर आहे.”
हेही वाचा –प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम
कर्करोगासारख्या आजाराचं निदान झाल्यावर एखादा माणूस डगमगला असता. नैराश्येत गेला असता. पण याबाबत संजय राऊत म्हणाले, कर्करोगाचं निदान झालं तेव्हा मी हसलो, म्हटलं ठीक आहे. पण कुटुंबाने सांगितलं की उद्याच मला अॅडमिट व्हावं लागेल. मी मी म्हटलं, असं कसं शक्य आहे. सगळं शेड्युल ठरलंय. पण कुटुंबाने ऐकलं नाही. त्यांनी ऐन दिवाळीत किमोथेरपी, रेडिएशन दिलं.”
कर्करोगावरील उपचारांबाबतही संजय राऊत यांनी सांगितलं. आजारापेक्षा उपाय भयंकर असं म्हणत ते म्हणाले, “दीड महिना मी जवळजवळ बंदिस्तच होतोच. खूप त्रास असतो. पाणीही पिता येत नाही. पण यातून मी बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय.”




