‘महाराष्ट्र बाकी है’ म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले “जे हवं ते करा आम्ही…”
![‘महाराष्ट्र बाकी है’ म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले “जे हवं ते करा आम्ही…”](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/shivsena-mp-sanjay-raut-on-shivsena-vardhapan-din-2021.png)
मुंबई |
उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेते आता महाराष्ट्राची वेळ असल्याचं म्हणत ठाकरे सरकारला आव्हान देत आहेत. गुरुवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांकडून ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा नेत्यांकडून ‘युपी झांकी है, महाराष्ट्र बाकी है’ घोषणा दिल्या जात असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “पश्चिम बंगालच्या आधीही अशा घोषणा देत होते. पवारांनी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे ना. काय करणार आमच्यावर धाडी टाकणार, खोटे गुन्हे दाखल करणार अजून काय करु शकता. जे हवं ते करा आम्हीही तयार आहोत”.
- शरद पवारांची प्रतिक्रिया…
भाजपाकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असं बोललं जात असल्यासंबंधी विचारलं असता “ठीक आहे ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा शरद पवारांनी दिला.
- गिरीश महाजन काय म्हणाले ?
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. “देशाने मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. भाजपाचे विचार, कर्तृत्व, बोलणं यावर लोकांचा विश्वास आहे. पंजाब सोडलं तर इतर राज्यांमध्ये भाजपाने मुसंडी मारली असून बहुमताकडे जात आहेत. याउलट काँग्रेसने पाचही राज्यात एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, पण त्यांना एकूण ३५ जागाही मिळत नाहीयेत. इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली. “शिवसेना पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आली आणि मुख्यमंत्री बसवला. नुसती तोंडाची बडबड करण्याशिवाय यांना काय जमतं. पुढच्या निवडणुकीत दोन खासदार आणि २० आमदार निवडून आणून दाखवा,” असं आव्हान गिरीश महाजन यांनी यावेळी दिलं.