संभाजी भिडे म्हणतात, पंढरपूरच्या वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल
सांगली – पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हे तर जगातील कोरोना नामशेष होईल, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले आहे. पायी वारी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यासाठी त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी ‘पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर देशातील नव्हे तर जगातील कोरोना आटोक्यात नाही तर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्न नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी’, अशी विनंती संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
कोरोनामुळे राज्य सरकारने वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वार्या करणारे लाखो वारकरी असून वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर ‘चर्चेचे निमित्त करून केवळ १०० जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र १०० जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संतांच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ‘गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली. परंतु यावर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत’, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
त्याचबरोबर ‘शासनाकडून वारकर्यांचा विश्वासघात झाला असून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारुन पायीच वारी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांना फलटण येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. वारकरी सांप्रदायकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे’, असेही संभाजी भिडे म्हणाले आहेत.