‘प्रभू राम आधी महाराष्ट्राचा राजा, त्यानंतर अयोध्येचा’; इतिहासकार सदानंद मोरेंचा मोठा दावा
![Sadanand More said that Ram is officially the king of Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Sadanand-More-780x470.jpg)
पुणे | २२ जानेवारीच्या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा करताना आलेला अनुभव अलौकिक होता असं सांगितलं. अशात इतिहासकार सदानंद मोरे यांनी राम हा अयोध्येच्या आधी महाराष्ट्राचा राजा आहे, असा दावा केला आहे. त्यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
सदानंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्रात एक वारकरी संप्रदाय आहे जो ज्ञानोबा-तुकोबांचा आहे. दुसरा संप्रदाय हा रामदासी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात खूप वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्या संप्रदायाला राम कधीही वर्ज्य नव्हता. राम कृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य मंत्र आहे. वारकरी संप्रदायात नव्या माणसाला प्रविष्ट केलं जातं तेव्हा त्याला देण्यात येणारा मंत्र आहे तो म्हणजे राम कृष्ण हरी. तुकाराम महाराजांनाही त्यांच्या गुरुंनी राम कृष्ण हरी हाच मंत्र दिला. या मंत्रात राम आणि कृष्ण आहेत. असं असताना समर्थ रामदासांनी वेगळा संप्रदाय केला. समर्थांच्या आधी ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज हे सगळे होते. रामाबाबत पहिलं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे.
हेही वाचा – ‘सगेसोयरे’ म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? वाचा सविस्तर..
राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात गेले, त्यानंतर सीतेला रावणाने पळवलं. रामाने रावणाचा वध केला, त्याला सुग्रीव, हनुमान, अंगद यांच्यासह सगळ्या वानरसेनेची मदत मिळाली हे सगळं आपल्याला माहीत आहे. रामाचा वनवास सुरु असताना भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून १४ वर्षे राज्य केलं. भरताच्या कानी बातमी आली की सीतेचं हरण केलं आहे रावणाने. राम सैन्यानिशी लंकेवर स्वारी करायला निघाला आहे. मात्र ही बातमी भरतापर्यंत उशिरा पोहचली. त्याला कळलं तेव्हा तो सैन्य घेऊन निघाला. तो कुठे पोहचला? तर दंडकारण्यातील जनस्थान या ठिकाणी म्हणजेच नाशिक पंचवटी या ठिकाणी तो पोहचला. तिथे पोहचल्यावर भरताला समजलं की राम रावणाचं युद्ध झालं, रावण मारला गेला आणि राम आता परत येत आहेत, असं सदानंद मोरे म्हणाले.
अयोध्येत राम, लक्ष्मण सीता परतत आहेत हे त्याला कळलं. भरत त्यावेळी जनस्थान म्हणजेच आत्ताचं जे नाशिक आहे तिथपर्यंत पोहचला होता. तर प्रभू राम लंकेवरुन आला. या दोघांची पुन्हा भेट झाली. ही भेट जनस्थान या ठिकाणी झाली. त्यावेळी भरताने रामाला सांगितलं तुझा वनवासाचा काळ संपतोय त्यामुळे आम्ही तुझा राज्याभिषेक इथेच करणार. राज्याभिषेक कुठे झाला? तर जनस्थानात. म्हणजेच आत्ताच्या नाशिकमध्ये झाला. वशिष्ठ, वामदेव हे सगळे ऋषी त्या राज्याभिषेकाला आले होते. विविध नद्यांमधून जल आणलं गेलं, त्यानंतर रामाचा जनस्थानात म्हणजेच नाशिकमध्ये राज्याभिषेक करण्यात आला. अयोध्येतला राज्याभिषेक त्यानंतर झाला. त्यामुळे राम हा अधिकृतपणे महाराष्ट्राचा राजा आहे, असा दावा सदानंद मोरे यांनी केला आहे.