बिबट्याच्या हल्ल्यात मृत मुलीच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची मदत
![Rs 20 lakh aid to the family of the girl who died in the leopard attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Kolhapur-780x470.jpeg)
आमदार डॉ. विनय कोरेयांचा पाठपुरावा : शाहुवाडीतील पुसार्ले धनगरवाड्यातील घटना
शाहुवाडी : उदगिरीपैकी केदारलिंगवाडी (ता.शाहूवाडी) येथील पुसार्ले धनगरवाड्यातील मृत मुलीच्या कुटुंबीयांना वन विभागांकडून २० लाख रुपयांची मदत करण्यात आली.
दोन दिवसापूर्वी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी बिबट्याच्या हल्लात मृत्यूमुखी पडलेल्या मनीषा रामू ऊर्फ राया डोईफोडे (वय वर्ष १०) हिला न्याय मिळावा ह्या मांडलेल्या प्रश्नानंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली.
कोल्हापूर जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती मा.सुतार साहेब व मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांच्या हस्ते मुलीच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचा धनादेश व १० लाख रुपये मुदतबंद ठेव स्वरूपात देण्यात आली.
यावेळी सदर वारसांना मदत मिळावी म्हणून शित्तूर तर्फ वारुणचे माजी सरपंच माजी सरपंच तानाजी भोसले,शित्तूर तर्फ वारुणचे माजी सरपंच विश्वास पाटील,रंगराव पाटील,तानाजी पाटील,उदगिरीचे स्थानिक अंकुश पाटील,दगडू व्हरक,विठ्ठल व्हरक,धोंडीबा येडगे यांनी विशेष पाठपुरावा केला.
नरभक्षक बिबट्याला पकडणार…
तसेच नरभक्षक बिबट्याला दोन दिवसांत सापळा लावून पकडण्यासाठी यंत्रणा तयार केली आहे तसेच उदगिरी परिसरात वनविभागाचे गस्त पथक कार्यरत असून, जिथे हल्ला झाला त्या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावला असून वन्यजीव बचाव पथक आजपासून येथे कार्यरत ठेवले आहे. बिबट्याचा माग घेणारी मोहीम युद्धपातळीवर राबवीत असल्याचे मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी यावेळी सांगितले.