रोहित शर्मावर आयपीएल २०२५ नंतर होणार शस्त्रक्रिया, ५ वर्षांपासून ‘या’ समस्येने त्रस्त

Rohit Sharma : रोहित शर्माने नुकताच कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यामुळे तो आता फक्त एकदिवसीय सामन्यातच टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान, आयपीएल २०२५ नंतर या दिग्गज खेळाडूवर शस्त्रक्रिया होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. वृत्तानुसार, रोहित गेल्या पाच वर्षांपासून एका समस्येने ग्रस्त आहे. ज्यामुळे त्याला खूप नुकसान सहन करावे लागले आहे.
खरंतर रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याचे योग्य उपचार शस्त्रक्रियेद्वारेच होऊ शकतात आणि असा दावा केला जात आहे की तो आयपीएलनंतर हे ऑपरेशन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माला २०२७ चा विश्वचषक खेळायचा आहे आणि त्याच्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची हीच योग्य वेळ आहे. रोहित शर्मा बऱ्याच काळापासून ही शस्त्रक्रिया पुढे ढकलत होता. कारण तो संघाचा कर्णधार होता आणि मोठ्या स्पर्धांमुळे तो शस्त्रक्रिया करू शकला नव्हता.
हेही वाचा – ‘कृषी विभागाचे महाविस्तार – AI अॅप सुरु, शेतकऱ्यांना रिअल टाइममध्ये शेतीची माहिती मिळणार’
मात्र, आता तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आता त्याच्याकडे शस्त्रक्रिया करून त्यातून बरा होण्यासाठी पुरेसा वेळ आहे.रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेट खेळत नाही. पुढील ३ महिने एकदिवसीय मालिका नाही. अशा परिस्थितीत रोहितकडे सावरण्यासाठी पुरेसा वेळ आहे. रोहित शर्माच्या २०१६ मध्ये त्याच्या क्वाड्स टेंडनवर शस्त्रक्रिया झाली होती, ज्यातून बरे होण्यासाठी त्याला ३ महिने लागले. हॅमस्ट्रिंग शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी त्याला ३-४ महिने लागू शकतात.
भारताला बांगलादेशविरुद्ध पुढील एकदिवसीय मालिका खेळायची आहे. परंतु, बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंधही बिघडलेले असल्याने या मालिकेची अद्याप पुष्टी झालेली नाही. याचा अर्थ असा की रोहितला आयपीएल २०२५ नंतर शस्त्रक्रिया करून त्यातून बरे होण्यास कोणतीही अडचण येऊ नये. जर रोहितला २०२७ चा विश्वचषक जिंकायचा असेल तर त्याला पूर्णपणे तंदुरुस्त राहावे लागेल आणि ही शस्त्रक्रिया त्याच्यासाठी खूप मोठी गरज आहे.