‘पवार कुटुंबियांचं ठरलंय’, प्रवीण दरेकरांना रोहित पवारांचे सडेतोड उत्तर
!['पवार कुटुंबियांचं ठरलंय', प्रवीण दरेकरांना रोहित पवारांचे सडेतोड उत्तर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/पवार-कुटुंबियांचं-ठरलंय-प्रवीण-दरेकरांना-रोहित-पवारांचे-सडेतोड-उत्तर.jpg)
अहमदनगर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य करताना अप्रत्यक्षपणे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा लगावला होता. त्यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पवार यांना उत्तर दिले. त्याला पवार यांनीही प्रत्युत्तर दिल्याने दोघांचा चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे दिसून येते. ‘दरेकर यांनी पवार कुटुंबियांची चिंता करू नये, आमचं ठरलंय’, असे पवार यांनी म्हटलं आहे.
जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार पवार म्हणाले होते की, ‘२०१४ चे खरे मुख्यमंत्री भाजप नेते गोपीनाथ मुंडे होते. जर आज गोपीनाथ मुंडे असते तर राजकारणाची पातळी इतकी घसरली नसती.’ त्यांना उत्तर देताना दरेकर म्हणाले, ‘रोहित पवारांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी. आधी त्यांच्या घरातील मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवावं. उगीच वाद निर्माण करू नये. अजित पवार सांगतात ते रोहित पवारांनी लक्षात घ्यावं,’ असंही दरेकर म्हणाले.
आता पवार यांनी दरेकर यांना उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, काही राजकीय नेत्यांचं कर्तृत्व राजकारणाच्या पलीकडं असतं. तसंच कर्तृत्व स्व. मुंडे यांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे. त्यामुळं स्व. मुंडेंविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर यांनी स्वागत करायला हवं होतं. परंतु, तसं न करता उलट त्यांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली. हे आश्चर्यकारक आहे.’
‘कदाचित मुंडे यांच्या निधनानंतर दरेकर भाजपमध्ये आल्याने त्यांना मुंडे साहेब समजले नसावेत. आणि हो. पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर यांनी पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार’, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.