प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपला झटका, आयकर विभागाची छापेमारी
रामी हॉटेल ग्रुप आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध समूह
मुंबई : मुंबईतील रामी हॉटेल ग्रुपच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. जवळपास 30 हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जातंय. रामी ग्रुपचे राज शेट्टी आणि इतरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. आज (मंगळवार) पहाटेपासूनच सर्ज ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे. करचोरी प्रकरणात आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. दादरमधल्या रामी हॉटेलबाहेरही पोलीस तैनात असल्याचं पहायला मिळालं. इन्कम टॅक्सचं पथक पहाटेच या हॉटेलमध्ये पोहोचलं होतं. करचोरीप्रकरणात आयकर विभागाकडून छापेमारी केली जाते. त्यामुळे या छापेमारीतून कोणत्या गोष्टी समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रामी हॉटेल ग्रुप हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध समूह आहे. राज शेट्टी यांनी या हॉटेलची स्थापना केली. भारतासोबतच बहरीन, दुबई आणि ओमान यांसारख्या देशांमध्येही या ग्रुपचे हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि अपार्टमेंट्स आहेत. राज शेट्टी यांनी 1985 मध्ये रामी हॉटेल ग्रुपची स्थापना केली. सध्या ते या ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय कामगार आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी दुबईला गेल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये हा ग्रुप सुरू केला. रामी ग्रुपचे भारत आणि आखाती देशात 52 हॉटेल्स आहेत. राज शेट्टी आणि या हॉटेल ग्रुपशी संंबंधित इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. राज शेट्टी यांनी फोर्ब्ज मिडल ईस्ट मॅगझिनमध्ये युएईमधील टॉप 100 भारतीय लीडर्सच्या यादीत स्थान मिळवलं होतं.
हेही वाचा – चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने अनुराधा साळुंके यांचा प्रचाराचा शुभारंभ !
रामी हॉटेल ग्रुपवर याआधीही कारवाया
रामी हॉटेल ग्रुपवर अशा पद्धतीचे छापे टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी जून 2019 मध्ये दादर पूर्व इथल्या रामी गेस्टलाइन हॉटेलवर माटुंगा पोलिसांनी छापा टाकला होता. या हॉटेलच्या सातव्या मजल्यावर त्यांनी हा छापा टाकला होता. त्याठिकाणी क्रिकेट बेटिंग रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश होता. त्याआधी 2012 मध्ये खारमधील रमी गेस्टलाइन हॉटेलच्या डिस्कोथेक ‘मॅडनेस’ इथं कारवाई करण्यात आली होती. निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ हॉटेल सुरू ठेवल्यामुळे पोलिसांनी छापा टाकला होता आणि त्यातून वेश्याव्यवसायाचं रॅकेड उघडकीस आलं होतं. याप्रकरणी दहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती आणि 16 मुलींची सुटका करण्यात आली होती.




