दक्षिणेकडील कांद्याला पावसाचा तडाखा! महाराष्ट्रातील कांद्यावर भिस्त; यंदा राज्यात नुकसानीचे प्रमाण कमी
![सोलापुरात जानेवारीत कांद्याची उच्चांकी आवक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/KANDA-6.jpg)
पुणे, नाशिक |
दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटकात अवेळी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा या भागातील नवीन कांद्याला बसला आहे. दक्षिणेच्या तुलनेतच यंदा महाराष्ट्रातील कांद्याचे नुकसान कमी झाले असल्याने आता महाराष्ट्रातील कांद्यावरच भिस्त आहे. राज्याच्या बाजारात सध्या नवीन लाल हळवी कांद्याची तुरळक आवक सुरू झाली आहे. काही दिवसांत दक्षिणेकडूनही महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढेल, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. कांदा लागवडीत महाराष्ट्रातील कांद्याची प्रतवारी सर्वात चांगली समजली जाते. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश तसेच राजस्थानातील अलवार जिल्ह्यात कांदा लागवड केली जाते.
दक्षिणेकडील राज्यात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात कांदा लागवड केली जाते. तेथील कांदा स्थानिक पातळीवरील गरज भागवितो. केरळात कांदा लागवड केली जात नाही. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटकातील काही भागात कांद्याचे नुकसान झाले आहे. नाशिक भागात मध्यंतरी पाऊस झाला. मात्र, तेथील कांद्याचे फारसे नुकसान झाले नाही, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा परिसरातील नवीन लाल कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर करतात. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शेतकरी लाल कांद्याची लागवड करतात. नवीन कांद्याची बाजारात सध्या आवक सुरू झाली आहे. दक्षिणेकडील राज्यातून महाराष्ट्रातील लाल कांद्याला चांगली मागणी राहील, असेही पोमण त्यांनी नमूद केले.
- जुना कांदाही मुबलक
सध्या बाजारात जुना कांदा मुबलक असून डिसेंबर अखेरीपर्यंत बाजारात हा कांदा बाजारात उपलब्ध असेल. साठवणुकीतील जुना कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम होत असून यापुढील काळात शेतकरी मोठय़ा प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठवतील. १० डिसेंबरनंतर नवीन लाल हळवी कांद्याची बाजारात मोठय़ा प्रमाणावर आवक सुरू होईल. चांगल्या प्रतीच्या लाल कांद्याला दरही मिळतील, असे पोमण यांनी सांगितले.
- लाल कांद्याचा हंगाम डिसेंबरमध्ये
नवीन लाल कांद्याला गेल्या काही वर्षांपासून चांगले दर मिळत आहेत. पुढील काळात दक्षिणेकडून लाल कांद्याला मागणी राहील. नवीन लाल कांद्याचा हंगाम १० डिसेंबरनंतर सुरू होईल. बाजारात कांद्याचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात १० किलो नवीन कांद्याला १५० ते २३० रुपये दर मिळाले आहेत. दहा किलो जुन्या कांद्याला १७० ते २३० रुपये असे दर मिळाले आहेत.
- लासलगाव बाजारात लाल कांद्याची आवक
वाढली .. देशातील वेगवेगळय़ा भागातून कांद्याला चांगली मागणी आहे. नवीन लाल कांद्याची आवक बाजारात वाढली असून कांद्याचे दर स्थिर आहेत. मध्यंतरी कांदा दरात चढउतार झाले होते. पुढील एक ते दीड महिना कांदा दर स्थिर राहणार असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले. रविवारी (२८ नोव्हेंबर) जुन्या कांद्याला प्रतििक्वटल सरासरी दर १७५० रुपये तसेच नवीन कांद्याला प्रतििक्वटल १८०० रुपये असा दर मिळाला. नाशिक भागात नवीन कांद्याचे फारसे नुकसान झाले नाही.