#Pune :सरासरीच्या तुलनेत 1.2 अंश सेल्सियसने पारा वाढला; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज
पुणे | शहर परिसरात उन्हाचा जोर वाढला आहे. या महिन्यात सरासरीच्या तुलनेत 1.2 अंश सेल्सियसने पारा वाढला आहे. पुणे हवामान विभागाने विदर्भात सोमवार (दि. 28) ते बुधवार (दि. 30) या कालावधीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
पश्चिम विदर्भात व कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर विदर्भाच्या उर्वरित भागात व मराठवाड्याच्या काही भागात किंचीत वाढ झाली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली आहे.
विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात ब-याच ठिकाणी व कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
सोमवार ते बुधवार या तीन दिवसात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ऊकाडा वाढू लागल्याने घामाच्या धारा वाहत आहेत.नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. भरपूर पाणी प्यावे व योग्य आहार घ्यावा.