Pune : ‘माझी वसुंधरा ३.०’ अभियानात पुणे जिल्हा सर्वोत्कृष्ट
पुणे जिल्ह्यासह बारामती, लोणावळा आणि माळेगावचा होणार सन्मान
![Pune District Best in Majhi Vasundhara 3.0 Campaign](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Majhi-Vasundhara-3.0-780x470.jpg)
पुणे : राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा ३.०’ अभियानात पुणे जिल्ह्याने बाजी मारली आहे. जागतिक पर्यावरण दिवशी ( ५ जून) मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्यासह बारामती, लोणावळा आणि माळेगावाचा सन्मान करण्यात येणार आहे.
‘माझी वसुंधरा ३.०’ अंतर्गत भूमी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याने सर्वेत्तम कामगिरी केली आहे.
बारामती आणि लोणावळा नगर परिषदांनी ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, तर माळेगाव नगर पंचायतीने २५ हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी या दोन्ही शहरांनी वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याची नोंद वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने घेतली आहे.
हेही वाचा – ‘काम न केल्यास एकेकाच्या कानाखाली देईन’; अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या यशाबद्दल बारामती, लोणवळा नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसह जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभिनंदन केले आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांसोबत नागरिकांची स्वच्छता आणि पर्यावरणाप्रती जागरुकता महत्वाची असल्याने त्यांनी नागरिकांचेही अभिनंदन करून भविष्यात अशीच उत्तम कामगिरी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
२४ नवीन हरित क्षेत्रांची निर्मीती
भूमी घटकांतर्गत जिल्ह्यात १ लाख ५० हजारांपेक्षा अधिक वृक्षलागवड केली असून, जिवंत वृक्षांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात एकूण २४ नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती केली आहे. वायू घटकांतर्गत नगर परिषदांनी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली असून, ५० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट उभारले आहेत.