लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब, राहुल गांधीची जहरी टीका
![Prime Minister also disappears along with vaccines, oxygen and drugs, poisonous criticism of Rahul Gandhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Modi-And-Rahul.jpeg)
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. देशात केवळ सेंट्रल विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे पंतप्रधांनांचा फोटो असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. ते म्हणतात की, “देशात कोरोनाची लस, ऑक्सिजन आणि औशधांसोबत पंतप्रधानही गायब झाले आहेत. उरलंय ते फक्त सेंट्रस विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे पंतप्रधानांचे फोटो.”
राहुल गांधींनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आधी मोदी सरकारवर टीका करताना म्हटलं होतं की, “देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही.”
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना ऑफलाइन बुकिंगचीही सुविधा मिळावी. देशातील कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान मात्र गप्प असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.