छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगड ३६१ मशालींनी उजळला
![Pratapgad fort, a witness to Chhatrapati Shivaji's glorious feat, was lit by 361 torches](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/satara.jpg)
वाई |
छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगड ३६२ मशालींनी उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३६१ वर्षे पूर्ण झाल्याचे. नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील प्रतापगड,महाबळेश्वर,सातारा,पुणे,कोल्हापूर,सांगली आदी विविध भागांमधून हजारो भाविकांनी तरुणांनी प्रतापगडावर हजेरी लावली. नवरात्री पूर्वी पंधरा दिवस आधीपासून या महोत्सवाच्या तयारीचे काम सुरु होते. असंख्य लोक या कामात आपला खारीचा वाटा उचलतात. प्रतापगडावर प्रेम करणारे अनेक शिवभक्त या कार्यक्रमात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मदत करतात. मशाल महोत्सवासाठी लागणाऱ्या मशाली तसेच इतर साहित्याची तयारी गडावर जोरात सुरु होती.यासाठी प्रतापगड परिसरासह सातारा,पुणे,कोल्हापूर जिल्ह्यातून कार्यकर्ते गडावर पोहोचतात.शनिवारी दिवसभर या कार्यक्रमाची तयारी सुरु होती.
भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील प्रसिद्ध स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात व भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला. प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजराण्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.