विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरु होती. राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगला. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तिसरीकडे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीदेखील निवडणुकीला सामोरे गेली. आता राज्यभराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा – अजित पवार यांना कोर्टाने बजावले समन्स
राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यंदा राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. आता शनिवारी (दि. 23) राज्यात मतमोजणी पार पडणार आहे. उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल स्पष्ट होईल. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. वंचित बहुजन आघाडी यावेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोठं वक्तव्य केलं आहे. “जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे. तर राज्यात महायुती की महाविकास आघाडी? नेमकं कोण सत्ता स्थापन करणार? याचे चित्र शनिवारी स्पष्ट होणार आहे.