पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सामान्यांना मिळणार मोठी खुशखबर!

Petrol Diesel Price | सर्वसामान्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने सरकारी तेल कंपन्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारद्वारे लवकरच पेट्रोल व डिझेलच्या किमतीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कच्च्या तेलाच्या किमती जवळपास तीन वर्षांच्या निचांकी पातळीवर घसरल्या आहेत. यामुळे तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल- डिझेलच्या किमतीत कपात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असली तरी भारतात अद्याप पेट्रोल अथवा डिझेलच्या किमती कमी झालेल्या नाही. मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीयांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरापासून दिलासा मिळालेला नाही.
हेही वाचा – दिलीप मोहितेंना आमदार करा, लाल दिव्याची गाडी मिळेल; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ३ वर्षांच्या निचांकी पातळीवर आल्या आहेत. मंगळवारी १० सप्टेंबर रोजी बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा दर डिसेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच प्रति बॅरल ७० डॉलरच्या खाली घसरला. जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याने इंधनाची मागणी कमी झाल्याचा हा परिणाम आहे.
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लीटर २ रुपयांनी कमी केल्या होत्या. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





