पवना धरण ९० टक्के भरलेः नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुळशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सोडला जाण्याच्या सुचना
![Pavana Dam, 90 percent full, riverside residents, caution alert, Mulshi Dam, water from spillway, controlled release, release notices,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Pawana-Dam-700x470.jpg)
पिंपरी : पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यातून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणी पातळीची वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पवना धरण सध्या ८९.८२ टक्के भरले आहे. तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सोडला जाण्याच्या सुचना महापालिका प्रशासनाला मिळाल्या आहेत. या सर्व बाबी विचारात घेता प्रशासनाला सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मुळशी धरणाचा जलाशय साठा ४७९.९५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८४ टक्के आहे तर उपलब्ध पात्राची क्षमता ९० दशलक्ष घनमीटर एवढी शिल्लक आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी सरासरी आवक आणि उपलब्ध धरण पात्राची क्षमता पाहता धरणाच्या सांडव्यावरून आज दूपारी १ वाजता नियंत्रित विसर्ग मुळा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना मुळशी धरणाच्या प्रमुखांनी दिली आहे. मुळा नदी पिंपरी चिंचवड शहरातून दापोडी लगत वाहत जाते. नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाचा परिणाम या भागातील नदीकाठच्या नागरिकांवर होण्याची शक्यता विचारात घेऊन या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे. विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये. आपले साहित्य अथवा जनावरे असल्यास ते सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे देखील त्यांनी सांगितले आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, क्षेत्रीय कार्यालये आणि इतर संलग्न विभागांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. सर्व क्षेत्रनिहाय पुरसदृश परिसराची पाहणी करून महापालिकेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने संभाव्य पुरस्थितीमध्ये योग्य ती कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. याचबरोबर पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांचे धरण धरणप्रमुख, हवामान विभाग, तसेच एन. डी. आर. एफ, लष्कर यांच्याशीही समन्वय साधण्यात आला आहे. शहरातील पूरबाधित परिसरांमध्ये नागरिकांसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये मदत शिबीरांचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी स्वच्छता, आरोग्य, सुविधा आणि जेवणाची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्याचे नियोजन केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता पूरपरिस्थिती उद्भवल्यावर नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी क्षेत्रनिहाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पावसात रस्त्यावरील विजवाहक तारा, विजेचे खांब, डी. पी. बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विदयुत वाहक ठिकाणांच्या संपर्कात येऊ नये तसेच अशा ठिकाणी जनावरे सोडू नये किंवा बांधू नये. औदयोगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करु नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात त्यामुळे त्यापासून नागरिकांनी जपून रहावे, असे आवाहन देखील बहिवाल यांनी केले आहे.