परभणी: कैद्याला भेटण्यासाठी आलेल्या पत्नीकडून गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतूस जप्त
![Parbhani: Village pistol, 2 live cartridges seized from wife who came to visit prisoner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/pistol.png)
परभणी | परभणी जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्याला भेटण्यासाठी आलेल्या पत्नीजवळून पोलिसांनी २ जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ४ मे रोजी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितेच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
परभणी जिल्हा कारागृहात असलेल्या कैदी सनिदेवल काळे याला भेटण्यासाठी त्याची पत्नी पिरी सनिदेवल काळे (रा मोहळ जि.सोलापूर) ही येणार अ, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी तांडा येथे ती थांबली आहे. तिच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून ४ मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक महातपुरी तांडा येथे दाखल झाले. तेव्हा महातपुरी तांडा ते सोनपेठ रस्त्यावर कॅनालजवळ एक महिला लहान बाळासह वाहनाची वाट पहात रस्त्याच्या कडेला थांबलेली पोलिसांना दिसली होती.
पतीला भेटण्यासाठी निघाली होती महिला
पोलीस कर्मचारी आव्हाड यांनी पंचासमक्ष या महिलेची झडती घेतली. तेव्हा पिशवीमध्ये एका रुमालामध्ये गुंडाळून ठेवलेले एक गावठी पिस्तूल (कट्टा) आणि दोन जिवंत काडतूस आढळले. हे पिस्तूल पती सनिदेवल काळे याचे आहे, असे या महिलेने पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. चव्हाण यांनी जप्ती पंचनामा करून पिस्टल आणि काडतूस जप्त केले आहेत. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.