जावली तालुक्यातील भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या आलेवाडीची भात लावणी…
![Javali, taluka, paddy storehouse, identity, alewadi, paddy planting...,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Bhat-lagan-780x470.png)
जावली तालुक्यातील आलेवाडी गावात ज्वारी, भात, हरभरा इ. महत्वाची पिके घेतली जातात. त्यापैकी भात हे एक प्रमुख पीक असून भाताच्या अनेक जाती घेतल्या जातात त्यामध्ये आंबेमोहोर, इंद्रायणी, तामसाळ, वरंगळ, पनवेल, कर्जत, मेनका, दोडाक, चिमणसाळ इ. प्रकारचा भात पिकविला जातो तसेच पेरणीचा काळीसाळ ही केला जायचा हा भात खायला चविष्ट असायचा आता कोणी करीत नाही. गावची शेतजमिनीची नैसर्गिक गुणवत्ता ही तांदूळ उत्पादनासाठी पोषक आहे.
आलेवाडी हे गाव सुवासिक, चवदार तांदूळ पिकविणारे गाव म्हणून ओळखले जाते. विशेषतः इंद्रायणी भात पिकास पोषक असलेले मातीतील गुणधर्म येथील मातीत आहेत. आंबेमोहराप्रमाणेच सुगंधित, चवीला गोड, खाण्यास मऊ पण थोडा चिकट असलेल्या इंद्रायणी तांदळाची लोकप्रियता वाढू लागली आहे. अशा या गावातील भात पिकाचे महत्व आणी त्यापाठी भात लावणी कशी केली जाते ते जाणून घेऊया.
आलेवाडीला तिन्ही बाजूंनी डोंगर असल्यामुळे डोंगरातून असंख्य छोटे नाले, ओहोळ वाहत सखल भागात येतात तेव्हा ते भातखाचरात शिरकाव करतात ही भात खाचरे छोटी छोटी एकाखाली एक उभी आडवी ताली तुंबा घालून आपल्या पूर्वजांनी तयार केलेली आहेत. भात खाचराची जमीन मऊ लोण्यासारखी, चिकणमातीसारखी असते. याच भात खाचरातून उत्कृष्ट प्रतीचा तांदूळ आलेवाडीतील शेतकरी पिकवीत आले आहेत. राज्य पातळीवर बक्षीस घेवून नावलौकिक मिळविला आहे.
पावसाळा सुरु झाला की वेध लागतात तरवा टाकण्याचे त्यापूर्वी उन्हाळ्यात खाचरात नांगरट करून कुळव फिरवून जमिनीची मशागत केली जाते शेणखत पसरून टाकलं की पाऊस थोडा झाला की भात खाचराच्या मध्यभागी उंचवटा असेल तिथे तरवा (बियाणं) टाकलं जातं सुमारे 25 ते 30 दिवसात भाताची रोपे तयार होतात.
आषाढ श्रावण महिन्यात जोराचा पाऊस झाला आणी ओढ्याला तुडुंब भरून पाणी वाहू लागलं की भात खाचरं जलमय होतात खाचरांचे ठिकठिकाणी तलाव दिसू लागतात पाऊसाने वेग धरला की एका दमात भात लावणी उरकायची असते. अशी वर्षानुवर्षे परंपरा आहे कामानिमित्त शहरात गेलेली मंडळी भात लावायला गावात येतात शेतकऱ्यांना भातलावणी हा एक सोहळाच असतो. घरातल्या स्त्रिया लवकर उठून न्याहरी बनवतात मनोरंजनासाठी भल्लरीची गाणी म्हणतात. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या डोंगराच्या कुशीत सुरु असलेली भात लावणी बघणं म्हणजे एक नेत्रसुखद सोहळा असतो. हिरवे डोंगर, पाण्याने भरलेले वाहते, ओढे यात लक्ष वेधून घेतात. ती भात खाचरे त्यात वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार गच्च रोप,
भात लागणीची लगबग सुरु होते अगदी पहाटेच शेतकऱ्याचा दिवस सुरु होतो. झुंजु मुंजू व्हायच्या आतच शेतकरी आपली बैलजोडी घेवून भातखाचरांकडे जायला निघतो. सोबत चिखल करायचा नांगर, पाट्याळ घेतलं की एका बाजूने भातखाचरात चिखल करायला सुरुवात करतो. त्यापूर्वी तरवा काढणीचे काम स्त्रिया करीत तरवा काढतांना पिडे ठेवून त्यावर बसले की तरवा काढायला सोपं जाई मूठ बांधण्यापूर्वी मुळांचा चिखल खाचरातल्या पाण्यातच खंगळून काढायचा. आणी त्याच मुठीतल्या पात्यांनी सगळ्या रोपांना एकत्र बांधायचे गाठ एवढी सोपी की लावणी करतेवेळी एका हाताने वर सरकवली की रोपे खळकन मोकळी डाव्या हातात मूठ धरून उजव्या अंगठ्याने चिखलात रोपं खोवले की दुसरे खोवायचे. तरव्याच्या मुठी तयार करून व्यवस्थित बांधावर ठेवल्या की बांध हिरव्या मुठींनी सजला जायचा धो-धो पाऊस असेल तर अंगावर इरलं, खोळ, पोत घेऊन डोक्याला आणी कमरेला दोरीनं बांधून घेतलं की पटापट काम करायला सुरुवात केली जायची वरून जोराचा पाउसा बरोबरच मालदेव खिंडीतून सुटलेला वादळी वेगाचा भन्नाट वाऱ्याशी मुकाबला करीत काम करावं लागे. खरं म्हणजे भात लावणी हा एक योगाचा व्यायाम प्रकार आहे. कमरेत वाकून एकाग्र चित्ताने सलग काम करणे हे सोपं नाही.
पाण्याने आणी चिखलाने भरलेल्या भात खाचरात दोन बैलाचा नांगर उभा आडवा फिरवला जाई. हा नांगर वजनाने हलका असला तरी गुडघाभर चिखलात नांगर वेगाने हाकताना एका हाताने नांगर चिखलातून उचलून पुन्हा ठेवला जाई हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही उभा आडवी नांगरट झाली की मऊसूत झालेला चिखलात पाट्याळ फिरविले जाई कुठेही राळ, ढेकळं राहू नयेत याची दक्षता घेतली जाई.
बांधावर जाई कुणी लाविली लाविली रामा || 2||
लाविली लक्ष्मण दिराने, दिराने रामा
जाईला पाणी कुणी घालती, घालती रामा
घातीलं लक्ष्मण दिराने रामा, घातीलं लक्ष्मण दिराने रामा
जाईच्या कळा कुणी तोडिल्या रामा ||2||
तोडिल्या लक्ष्मण दिराने, लक्ष्मण दिराने रामा
जाईचा हार कुणी गुंफिला, गुंफिला रामा
गुंफिला, गुंफिला लक्ष्मण दिराने रामा
सीताच्या गळ्यात हार कुणी घातीला रामा
घातिला, घातिला लक्ष्मण दिराने रामा
बांधावर जाई कुणी लाविली, लाविली रामा || 2||
धो धो कोसळणाऱ्या पावसात दोन्ही टोकाकडे दोरी लावून एका रांगेत उभे राहून वाकून भाताची रोपे रोवली जातात हे दृष्य बघण्यासारखं असतं भात लावण्यापूर्वी गुळ भात दुधाचा नैवेद्य दाखवूनच भात लावणीस सुरवात होते. भल्लरीची गाणी म्हणत जलद गतीने भात लावणीचा आनंद अवर्णनीय असतो. खाचराच्या मध्यभागी आल्यावर रोपाची अक्खी मूठ “कणंग” म्हणून रोवली जाते या पाठीमागे घरात असणाऱ्या कणगी भराव्या अशी अपेक्षा असते. कष्ट केलेल्या श्रमाचं फळ मिळावं.
शिवारात सगळीकडे भल्लरीच्या गाण्यांनी वातावरणात नादमय सूर भरला जातो. मंजूळ स्वर कानी पडतात सगळ्या शिवारात घाईगडबड चाललेली असते. कोणाला बोलायला वेळ नसतो न्याहरीच्या वेळी चिखलाने बरबटलेले हात तिथल्याच पाण्यात धुवून कोणी बांधावर बसून तर कोणी उभे राहूनच हातावर भाकरी घेवून घेवड्याची आमटी, चटणी बरोबर खालेल्या अन्नाला जी चव असते ती कुठल्याही हॉटेलातल्या जेवणाला नसते.
गुडघा गुडघा चिखलात वाक वाकून भात लावणी करणं सोपं नसतं. अमाप कष्ट उपसणाऱ्या बायाबापडयांना बघितलं की आपण काय किती कष्ट करतो याची जाणीव होते. शेतकऱ्याला कष्ट किती आणी उत्पन्न आणी मिळकत किती याच गणित ज्या दिवशी सुटेल तो दिवस नशिबाचा. अशा या आलेवाडी गावात 1978-79 ला इतिहास घडला गावातील प्रगतशील शेतकरी कै. बाजीराव पाटील आणी त्यांचे कुटुंब यांनी अभ्यास करून शेती क्षेत्रात तज्ञ असणाऱ्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन भात पीक स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. दोन्ही ठिकाणी तत्कालीन शिक्षण सभापती जी. जी. कदम तसेच जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक आलेल्या शेतकऱ्यांना तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार आणी राज्यपाल महोदय यांचे शुभहस्ते मानसन्मान करण्यात आला हा आलेवाडी गावचा बहुमानच होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून अनेक शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी मार्गदर्शन घेतल. आज आलेवाडीत प्रदीप पवार (आण्णा पाटील) साहेबराव पवार, काशिनाथ दुटाळ , विलास पवार, बाबासाहेब पवार, बी. डी. पवार, सुधाकर भिलारे, चंदरराव बिरामणे, राजेंद्र पवार असे अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात आधुनिक पद्धतीने भातशेती करीत आहेत.
– संजय पवार, आलेवाडी