Osmanabad Loksabha : उमरग्याच्या सरांना मातोश्रीचा डच्चू; शिवसेनेचे निंबाळकर लोकसभेच्या मैदानात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/osmanabad.jpg)
- सरांच्या नावाला शिवसैनिकांचा होता विरोध
- निंबाळकरांनी साधला होता थेट उध्दव ठाकरेंशी संपर्क
अमोल शित्रे
पुणे, (महा-ई-न्यूज) – कोणत्या ना कोणत्या कारणांवरून सतत वादातीत राहिलेले उस्मानाबादचे शिवसेना खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांना मातोश्रीवरून डच्चू दिला आहे. गेल्या पाच वर्षातील त्यांची गाजलेली कारकीर्द पाहून त्यांच्या उमेदवारीला पक्षाने यावेळी कात्री लावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देऊन त्यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सून अर्चना पाटील आणि निंबाळकर यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे.
सन २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत प्रा. गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा सर्वाधिक मताने पराभव केला होता. सन २००९ च्या निवडणुकीत प्रा. गायकवाड हे अवघ्या ६ हजार ७८७ मताने पराभूत झाले होते. या पराभवाचा वचपा प्रा. गायकवाड यांनी २०१४ च्या निवडणुकीत काढला होता. जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक २ लाख ३४ हजार ७८७ मताधिक्क्याने विजयी होणारे खासदार प्रा. गायकवाड हे द्वितीय स्थानी होते.
एकीकडे सर्वात कमी मताधिक्के घेवून पराभूत झालेले लक्ष्मनराव ढोबळे तर सर्वाधिक मताधिक्के घेवून विजयी उमेदवार म्हणून प्रा. गायकवाड यांच्या नावाची नोंद झालेली आहे. परंतु, निवडून आल्यानंतर खासदार गायकवाड यांनी उस्मानाबाद मतदार संघाकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. नागरिकांची कामे करण्याऐवजी त्यांचे नाव उपद्रवी भूमिकांमुळेच सर्वाधीक काळ चर्चेत राहिले आहे. त्यामुळे लोकांची नाराजी ओढवलेले खासदार अशी समजूत पक्षश्रेष्ठींची झाली. एअर इंडिया कंपनीच्या कर्मचा-याला त्यांनी 25 वेळा सॅण्डलने मारहाण केल्याचा त्यांचा मुद्दा चांगलाच अंगलट आला आहे. त्यांना आता ओमराजे निंबाळकर यांचे प्रचारक म्हणूनच जबाबदारी स्विकारावी लागणार आहे.
कराण, गेल्या कित्येक दिवसांपासून निंबाळकर हे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पक्षातील दिग्गज नेत्यांची भेट घेतल्याचीही माहिती समजते.
सरांनी संधी गमावली…
राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वादग्रस्त कारकीर्दीचा त्यांना चांगलाच फटका बसला. राज्यातील नामांकीत मंत्री पदे भूषविलेल्या डॉक्टरांवर आज राजकीय सन्यास घेण्याची वेळ आली. त्याचा फायदा घेण्याची नामी संधी प्रा. रवी सरांपुढे होती. 2014 मध्ये उस्मानाबाद मतदार संघात सरांची म्हणावी तेवढी लोकप्रियता नव्हती. तरी देखील या दुष्काळग्रस्त भागातील भाबड्या जनतेने सरांना निवडून देऊन पाटलांवरचा राग व्यक्त केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांची कामे करण्याची संधी असताना सरांनी पाच वर्षे फुकटची घालवली. त्यामुळे केंद्राच्या प्रभावी योजना राबविण्यासाठी अत्यंत अनुकूल असलेल्या या मतदार संघातील नागरिकाने पुन्हा त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. जे डॉक्टरच्या बाबतीत घडले तेच तर सरांना भोगण्याची वेळ आली आहे. तिकीट दिले तरी सरांचा पराभव अटळ होता, असा संदेश स्थानिक शिवसैनिकांनी युतीच्या कारभा-यांना पाठविला होता. त्यामुळे त्यांना पक्षाने घरचा रस्ता दाखविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.