अरेरे भयानकः ‘महादेव अॅप’चा अफाट मायाबाजार!
१६ बँकांत ४५२ खाती, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
![Oh Terrible: The Mayabazaar of 'Mahadev App'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Crime-mahadev-App-780x470.jpg)
पुणे : ‘नारायणगावातून या अॅपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविण्यात येत असलेल्या इमारतीवर छापा घालून पोलिसांनी ६२ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या वेळी ९३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी पाच जणांना पोलिस कोठडी, तर ८८ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. ‘महादेव बुक अॅप’च्या माध्यमातून ‘बेटिंग’च्या देवाणघेवाणीसाठी १६ बँकांतील ४५२ खात्यांचा वापर करण्यात आला असून, त्यापैकी अनेक खाती सर्वसामान्यांच्या नावावर आहेत. त्यातून ‘बेटिंग’चा पैसा परदेशांत वळविण्यात आला आहे का, देशविघातक कारवायांसाठी त्याचा वापर करण्यात आला आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलिस करत आहेत.
कुणाल सुनील भट (वय २८, रा. विवेकानंदनगर, जळगाव), समीर युनूस पठाण (वय २५, रा. शुक्रवार पेठ, जुन्नर), राशिद कमाल शरीफउल्ला (वय २८, रा. वजिराबाद, दिल्ली), अमजद खान खान सरदार खान (वय ३२, रा. दुर्गागंज, लखनौ) आणि यश राजेंद्रसिंह चौहान (वय २६, रा. जय गणेशनगर, जयपूर) हे पोलिस कोठडीत असून, ते व्यवस्थापक म्हणून काम पाहात होते,’ असे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या कारवाईत पोलिसांनी ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल, आरोपींच्या वापरातील १०१ मोबाइल, ४५२ बँक खाते पुस्तिका आणि डेबिट कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, किरण अवचर, सतीश होडगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बँक खात्यातून सट्टेबाजीचे व्यवहार
समाजमाध्यमे किंवा इंटरनेटवर ‘महादेव बुक अॅप’ असे ‘सर्च’ केल्यास एक लिंक येते. त्यावर क्लिक केल्यानंतर एक ‘व्हॉट्सअप’ खाते उघडते. नारायणगावातील आरोपी या खात्यावर लिंक पाठवत. बेटिंग खेळणारी व्यक्ती त्या लिंकचा वापर करून सट्टा खेळायची, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी उघडलेली ४५२ बँक खाती कोणाच्या नावे काढली आहेत? त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
‘बीपीओ’च्या नावाखाली बेटिंग; मुख्य सूत्रधार पसार
नारायणगावातील ऋतिक कोठारी व सलमान मिरजकर उर्फ पठाण आणि जुन्नर येथील राज बकोरिया या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असून, त्यांनी ‘बीपीओ’ सुरू करण्याची बतावणी करून दीड-दोन महिन्यांपूर्वी इमारत भाडेतत्त्वावर घेतली आहे. ‘बीपीओ’च्या नावाखाली सट्टा चालणाऱ्या या इमारतीत देशभरातील तरुण काम करीत होते, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.
‘महादेव बुक अॅप’च्या माध्यमातून मिळालेला पैसा परदेशी वळविण्यात आला का? तो देशविघातक कारवायांसाठी वापरण्यात आला का? आणखी बँक खात्यांचा वापर ‘बेटिंग’साठी केला का, याचा तपास सुरू आहे. त्या अनुषंगाने आरोपींची चौकशी सुरू असून, बँक खात्यांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ केले जात आहे.