आता एसटीमध्येही ‘पॅनिक बटण’; महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : गेल्या काही कालावधीपासून महिलांच्या एसटी प्रवासातील सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटीमध्ये ‘पॅनिक बटण’ लावण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणा-या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यासह एसटी बसस्थानकांचे आधुनिकरण करून प्रवाशांना दर्जेदार सुविधा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
राज्यातील एसटी बसस्थानके अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यात येणार असून ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालये संबंधित विकासकाकडून बांधून घेणे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची राज्यभरात ८४२ ठिकाणी १,३६० हेक्टर जमीन आहे. त्याचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा – टोल संदर्भात पुढच्या 15 दिवसांत मोठा निर्णय; गडकरी नेमकं काय म्हणाले?
पहिल्या टप्प्यातील ६६ जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यात संबंधित विकासकाने एसटीच्या जिल्हा स्तरांवरील जागेसह तालुका स्तरावरील जागा व ग्रामीण भागातील जागा अशा तीन जागा विकसित करावयाची आहेत. त्यामुळे एसटीच्या अविकसित जागाही चांगल्या विकासकाकडून विकसित होतील.राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ केली जाईल, सरनाईक यांनी सांगितले.