ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शगुन चौक,पिंपरी येथील पूजा साहित्याच्या दुकानांना मध्यरात्री लागली आग; अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला

आग विझविताना दोन अग्निशमन जवान जखमी; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पिंपरी | पिंपरी येथील शगुन चौक परिसरात मध्यरात्री दोन पूजा साहित्याच्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याची मोहीम हाती घेतली. मुख्य अग्निशमन केंद्रासह नेहरूनगर, थेरगाव आणि रहाटणी अग्निशमन केंद्रांतील जवानांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इतर दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र आग विझविण्याच्या प्रयत्नात दोन अग्निशमन जवान किरकोळ जखमी झाले.

मध्यरात्री १२:४९ वाजता शगुन चौकातील दोन पूजा साहित्याच्या दुकानांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य अग्निशमन केंद्र तसेच नेहरूनगर, थेरगाव आणि रहाटणी अग्निशमन केंद्रांतील अग्निशमन वाहने तातडीने रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध दिशांनी प्रयत्न सुरू केले.

आगीच्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेत जवानांनी दोन्ही दुकानांमध्ये कोणतीही व्यक्ती अडकलेली नसल्याची खातरजमा केली. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दोन्ही दुकानांमध्ये पूजा साहित्य आणि इतर वस्तूंचा साठा असल्याने त्यांचे आगीमुळे नुकसान झाले. मात्र, अग्निशमन दलाच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आग लगतच्या परिसरात पसरण्याचा धोका टळला.

हेही वाचा

मेट्रो-3 वरील पहिल्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थिनी, आयटीएन्सशी संवाद

या कारवाईदरम्यान फायरमन प्रणय शिर्के आणि फायरमन आदिल गोडे हे दोन जवान किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत नागरिकांचे आणि परिसराचे संरक्षण करण्यासाठी अग्निशमन जवानांनी केलेले प्रयत्न या कारवाईतून अधोरेखित झाले.

सदर मोहिमेसाठी उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, लीडिंग फायरमन विजय घुगे, फायरमन प्रणय शिर्के, फायरमन आदिल गोडे यांच्यासह विविध अग्निशमन केंद्रांतील जवान आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग वेळेत नियंत्रणात आणून संभाव्य मोठे नुकसान टाळण्यात यश आले.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी. आग लागल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने अग्निशमन दलाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून घटनेचे ठिकाण आणि परिस्थितीची स्पष्ट माहिती द्यावी. तसेच अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करणे हे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शगुन चौक येथील आगीच्या घटनेत जवानांनी तत्परतेने आणि समन्वयाने केलेल्या कारवाईमुळे आग लगतच्या दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखता आली आणि मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेदरम्यान जखमी झालेल्या जवानांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावणाऱ्या अग्निशमन जवानांची कर्तव्यतत्परता आणि धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group