आता देवेंद्र फडणवीस उतरणार प्रचाराच्या मैदानात; 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज घेणार सरासरी तीन सभा

Devendra Fadnavis : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आल्याने राज्यात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. पंचायत समिती, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी आजपासून प्रचार दौरा सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आजपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत सलग प्रचारसभा घेणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या या सभांमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होणार आहे. या संपूर्ण प्रचार मोहिमेत दररोज सरासरी तीन प्रचारसभा घेण्याची मुख्यमंत्र्यांची योजना असून, त्यामुळे पक्षाच्या प्रचाराला मोठी चालना मिळणार आहे.
हेही वाचा – सत्तेवर नाही तर सेवेवर माझा विश्वास : अनुराधा साळुंखे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानले जातात. पंचायत समित्या आणि नगरपरिषदांच्या माध्यमातून स्थानिक विकासाचा आराखडा ठरतो.त्यामुळे पक्षांच्या ताकदीची खरी परीक्षा या निवडणुकांमध्ये होत असते. त्यामुळेच भाजपने उच्चस्तरीय नेतृत्वाला प्रचाराच्या आघाडीवर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री आपल्या सभांमधून राज्य सरकारच्या योजनांची माहिती, विकासकामांची यादी आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या उपक्रमांचा उल्लेख करून मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. स्थानिक नेतृत्वांनाही या सभांमुळे मोठी ऊर्जा मिळणार आहे.याचबरोबर, आगामी मोठ्या निवडणुकांसाठीही हा प्रचार दौरा भाजपच्या जमिनीवरील ताकदीचा आढावा घेण्यासाठी फायद्याचं ठरणार आहे.




