राज्य सरकारचे नवे निर्बंध! लग्नाला ५०, अंत्यविधीला २० लोकांना परवानगी
![करोनाची तिसरी लाट कधी संपणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात….](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Corona-Omicrona-variant-maharashtra-covid-19.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात आतापर्यंत साडेपाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील ओमायक्राॅनबाधित रुग्णांची संख्याही साडेचारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ३० डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. या नव्या नियमानुसार, लग्न समारंभाला ५०, तर अंत्यविधीला फक्त २० लोकांना उपस्थित राहता येईल.
बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील अशा कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी, तर अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम १४४ लागू असणार आहे. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील. केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरू ठेवल्या पाहिजेत. त्यांचे शाळेत लसीकरण न करता त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन टप्प्याटप्प्याने करावे याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लस न घेतलेल्या लोकांचे लसीकरण तातडीने झाले पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.