भाजपाविरुद्ध लढण्यास राष्ट्रवादी तयार; नवाब मलिकांचं भाजपाला खुले आव्हान
![NCP ready to fight against BJP; Nawab Malik's challenge to BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Nawab-Malik-PTI.jpg)
मुंबई |
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. भाजपा ईडी, सीबीआय, एनसीबी सारख्या तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना बदनाम करण्यासाठी करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही असा आरोप करत भाजपावर टीका केली आहे तसंच भाजपाला आव्हानही दिलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले, “या राज्यात किंवा जिथे जिथे विरोधकांचं सरकार आहे त्या सर्व ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन त्या त्या सरकारला बदनाम करुन दबाव निर्माण करायचा. बंगालमध्येही अनेक नेत्यांना ईडीच्या साहाय्याने दबाव आणून भाजपामध्ये सामील करुन घेतलं. महाराष्ट्रात बरेच नेते भाजपात गेले त्यांच्यावरही ईडीचा दबाव होता. पण आमच्या तिन्ही पक्षांचे नेते भित्रे नाहीत, ते दबावाला बळी पडणार नाहीत. तुम्ही जेवढा दबाव आमच्यावर टाकाल, तेवढ्या अधिक ताकदीने हे सरकार कामाला लागेल. या सगळ्या कारवाया जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे”.किरीट सोमय्या महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार असं म्हणत आहेत. त्याबद्दल मलिक यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, “भ्रष्टाचारमुक्त करणे म्हणजे भाजपाच्या गंगेत डुबक्या मारणं असं आहे का? हे महाशय ज्यांच्यावर आरोप करत होते, त्या लोकांनी गंगेत डुबक्या मारल्यानंतर कुठे गेले त्यांचे आरोप? बँका बुडवणारे भाजपाचे किती नेते, मंत्री आहेत ते भविष्यात मी पुराव्यानिशी उघड करणार आहे. आता भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होऊ दे. आम्ही तयार आहोत”.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापे टाकले. प्राप्तिकर विभागाने इतर कंपन्यांवर छापे टाकले, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, पण ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या संस्थांवर छापे टाकले, त्याचे वाईट वाटल्याचे पवार यांनी म्हटले. “माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचे कर व्यवस्थितपणे वेळच्या वेळी भरले जातात. तरीही ही कारवाई राजकीय हेतूने केली की प्राप्तिकर विभागाला आणखी काही माहिती हवी होती, ते त्याबद्दल तेच सांगू शकतील. मात्र एका गोष्टीचे दु:ख आहे की, माझ्या बहिणी ज्यांची ४० वर्षांपूर्वी लग्ने झाली, त्या सुखाने संसार करतात, मुले-नातवंडे आहेत, त्यांच्या संस्थांवर छापे टाकले. त्यामागचे कारण समजू शकले नाही,” असे पवार यांनी गुरुवारी म्हटले होते.