Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

वैद्यकीय महाविद्यालयांमधील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एनसीआयएसएमची विशेष मोहीम; गोपनीय माहिती संकलन करण्याचे शिक्षकांना आवाहन

मुंबई : आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील अध्यापन व प्रशिक्षणाच्या गुणवत्तेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या संस्थांमधील गैरप्रकार उघडकीस येत नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रीय भारतीय चिकित्सा प्रणाली आयोगाच्या (एनसीआयएसएम) वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाने (एमएआरबी) विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार या संस्थांमधील अध्यापकांकडून गोपनीय माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उच्च शिक्षणासोबत रुग्णालयीन अनुभव आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेचा संपर्क विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रमाणात प्रत्यक्ष चिकित्सा आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संस्थांमधील या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मंडळाने अध्यापकांच्या माध्यमातून गोपनीय माहिती संकलित करण्याचे ठरवले आहे. केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेले अध्यापक, मान्यता मिळविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या बनावट रुग्ण नोंदी, प्रत्यक्ष रुग्णांची कमतरता असूनही दाखविण्यात येणारी खोटी माहिती तसेच नियमित शैक्षणिक सत्रे न घेणे, अशा प्रकारच्या बाबींची माहिती थेट मंडळापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे.

हेही वाचा –  ‘उद्योग विभागात ‘फॉलो-अप सेल’ व स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करणार’; उद्योगमंत्री उदय सामंत

प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या अध्यापकांच्या कार्यावर अशा गैरप्रकारांचा विपरीत परिणाम होत असतो. वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता घसरत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता वाढविण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे मंडळाने म्हटले आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि सोवा-रिग्पा या भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धतींना जागतिक स्तरावर अधिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिकतेची जपणूक आवश्यक असल्याचे मंडळाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे सर्व अध्यापकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे.

माहिती देण्यासाठी शिक्षकांनी केवळ आपला प्रमाणित ‘टीचर कोड’ नमूद करावा लागणार आहे. शिक्षकांचे नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, अशी हमी मंडळाने दिली आहे. मिळालेल्या माहितीचा वापर संशयित ‘ऑन-पेपर’ शिक्षकांची यादी तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील सुधारणा घडवून आणण्यासाठी योगदान देणाऱ्या अध्यापकांच्या कार्याची योग्य दखल घेतली जाईल, असेही मंडळाने नमूद केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button