एकनाथ शिंदे-अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या नाना पटोलेंचं घुमजाव

Nana Patole : काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. “आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ”, असं पटोले यांनी म्हटलं होतं. मात्र, पटोले यांनी आता त्यांच्या वक्तव्यावरून माघार घेतली आहे. पटोले म्हणाले, “ते वक्तव्य गमतीत केलं होतं.
काँग्रेस आमदार म्हणाले, “ते वक्तव्य करण्याआधीच मी म्हटलं होतं की बुरा ना मानो होली हैं, त्यानंतरच मी त्या गमतीदार विषयाला हात घातला. मी ते गमतीत म्हटलं होतं. काही लोक ते ऐकून गंभीर होत असतील तर त्यांनी गंभीर राहावं.”
दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे पूर्वी काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांची दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी चर्चा देखील झाली होती. आज पटेल आपल्यात नाहीत. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्याची कल्पना आहे.” पाठोपाठ विजय वडेट्टीवार म्हणाले, “राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.”
हेही वाचा – आम्ही जायचं कुठं? नाट्यगृहांसाठी बनवलेल्या रंगयात्रा ॲपविरोधात मराठी कलाकाराचं आंदोलन
संजय राऊत व विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “काल होळीचा, धुलीवंदनाचा दिवस होता. अशा सणांच्या दिवशी आमच्या संस्कृतीत आपसातील मतभेद विसरून आम्ही एकत्र येतो. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी देखील लोकांना न्याय मिळवून द्यावा हा संदेश मी या सणाच्या निमित्ताने दिला. या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान गंमत म्हणून मी ते वक्तव्य केलं होतं. मी ते वक्तव्य करण्याआधी बुरा ना मानो होली हैं, असं म्हटलं होतं. मी ते वक्तव्य गमतीत घेतलं. जर कोणी ते वक्तव्य ऐकून गंभीर होत असेल तर त्यांनी गंभीर व्हावं.”
नाना पटोले म्हणाले, “आमच्यासाठी शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना वीज नाही. ती समस्या हे सरकार सोडवू शकलं नाही म्हणून या सरकारने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांची घोषणा केली. परंतु, ते पंप देखील शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. जनावरांचा हैदास वाढला आहे. शेतांमध्ये, जंगलांमध्ये वाघ फिरत आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही, महागाई वाढली आहे, राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, सर्वसामान्य जनतेसमोर जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे. काँग्रेसला या सर्वांची काळजी आहे. आम्ही ती भूमिका घेत आहोत. जनतेच्या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून बोलत आहोत.”
काँग्रेस आमदार म्हणाले, “काल थट्टेचा दिवस होता, थट्टा काल संपली. आता जनतेच्या प्रश्नांवर भूमिका घ्यावी. प्रसारमाध्यमांनी देखील त्याकडेच लक्ष द्यावं.”