शेतीच्या वादातून मुलाच्या आणि जावयाच्या मदतीने सख्या भावाची हत्या
![Massacre in Gondia! The accused killed himself by killing three](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/murder-1_201707279.jpg)
कोल्हापूर – शेतीच्या वादावरून सख्ख्या भावाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
कसा घडला प्रकार?
हत्या झालेल्या इसमाचे नाव भगवान रामचंद्र बुचडे (५०) असून ते करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील रहिवासी होते. त्यांचा सख्खा भाऊ भैरवनाथ रामचंद्र बुचडे (५५) याने आपला मुलगा विकास बुचडे आणि जावई सुधीर थोरात यांच्या मदतीने भगवान बुचडे यांची हत्या केली. गेल्या चार वर्षांपासून या दोन्ही भावांमध्ये शेतीच्या जागेवरून वाद होते. मागील काही महिन्यापासून त्यांच्यात सातत्याने भांडणं होतं होती. अशातच मृत भगवान यांनी आपल्या घराच्या पाठीमागे गुरांसाठी गोठा बांधायला सुरुवात केली.
यातूनच वादाला तोंड फुटलं. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असतानाच पुतण्या विकास बुचडे घराकडे धावत गेला. त्याने घरातील धारदार सुरा घेऊन चुलत्याच्या शरीरावर सपासप वार केले. वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महेशवर आरोपी बापलेकांनी हल्ला केला. त्याचबरोबर या हाणामारीत आरोपीचा जावई सुधीर थोरातने मदत केली. आरोपी बापलेकाने फूटभर लांबीच्या सुर्याने भगवान यांच्या छातीसह पोट, कंबर, पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात भगवान यांचा रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींनी ताब्यात घेतलं असून संबंधित हत्येत जावयाच्या सहभागाची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.