Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

खासदार संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यात आली; राणे-सेना वादानंतर निर्णय

मुंबई |

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं मोठं वृत्त सध्या समोर येत आहे. राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊत यांच्या घर आणि सामनाच्या कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलं आहे. त्याचसोबत, डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याची देखील माहिती समोर येत आहे. ‘टीव्ही९ मराठी’ या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे-सेना वादानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. राऊत यांच्या या ताफ्यात सध्या ६ शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. मात्र, आता त्यांच्या ताफ्यात २ अतिरिक्त SPU चे जवान देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. काहीच दिवसांपूर्वी भाजपा नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी संजय राऊत यांना एक इशारा दिला होता. संजय राऊत जिथे दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करू, असा या दोघांनीही सांगितलं होतं. त्यानंतरच आता राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचं दिसून येत आहे.राऊत यांच्या सुरक्षेत १२ पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही करण्यात आला आहे.

  • राऊत-राणे संघर्ष टोकाला

खरंतर शिवसेना-राणे वाद हा काही महाराष्ट्राला नवा नाही. अवघ्या काहीच दिवसांपूर्वी राज्यात हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. केंद्रीय मंत्री नारायण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. भाजपा-सेना पुन्हा एकदा आमने-सामने आले. या सगळ्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये देखील मोठ्या शाब्दिक चकमकी झडल्या. याच दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राणेंवर घणाघाती टीका झाली. त्यामुळे संजय राऊत आणि राणे वाद पेटण्यास सुरुवात झाली. राणेंचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश राणे यांनी या वादात उडी घेतली होती. यावेळी अत्यंत टोकाच्या टीका पाहायला मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

  • अग्रलेखाची जबाबदारी माझी!

बुधवारी (२५ ऑगस्ट) ‘सामना’तील अग्रलेखात राणेंचा उल्लेख ‘भोकं पडलेला फुगा’ असा करण्यात आला. सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजपा चांगलाच आक्रमक झाला होता. इतकंच नव्हे तर सामनाच्या संपादिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, “मी सामनाचा कार्यकारी संपादक आहे. त्या संपादकीयाची जबाबदारी संजय राऊत यांची आहे”, असं म्हटलं होतं.

  • ‘सामना’तून राणेंवर बोचरी टीका

‘सामना’च्या त्या अग्रलेखात असं लिहिण्यात आलं होतं कि, “नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱया बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘‘मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,’’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button