काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया
![“Kolhapur's fort came to Kothrud, but it doesn't feel bad; But… ”, Sanjay Raut's warning to Chandrakant Patil!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Sanjay-Raut1.jpg)
नवी दिल्ली |
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी काळात काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं म्हटलेलं आहे, तर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नाना पटोलेंचं नाव देखील चर्चेत आणलं आहे.. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “ या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, काँग्रेसमध्ये एका पेक्षा एक सरस लोकं आहेत. सगळ्याच राजकीय पक्षात असे दावेदार असतात, प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना वाटतं पंतप्रधान व्हावं.
काँग्रेसमध्ये देखील खूप प्रमुख लोकं आहेत की जे पंतप्रधान पदाच्या लायकीचे उमेदवार आहेत, नक्कीच आहेत आणि राजकारणात कोणतीही आकांक्षा आणि स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. मला वाटत नाही काँग्रेसची काही नाराजी आहे. तुम्ही त्याकडे नाराजी म्हणून का पाहाता? तीन भिन्न विचारांचे पक्ष आहेत, त्यातून एक महाविकासआघाडी निर्माण झालेली आहे. ज्याला आपण किमान समान कार्यक्रम म्हणतो, त्या आधारावर हे सरकार बनलेलं आहे. हे सरकार बनवताना तीन पक्ष एकमेकांमध्ये विलीन झालेले नाहीत. पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र आहे. प्रत्येकाची विचारधारा स्वतंत्र आहे. सरकार बनवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, प्रत्येकाला आपला पक्ष विस्तारण्याचा वाढवण्याचा आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.”