चंद्रकिशोर पाटील यांचं मोदींकडून कौतुक?नाशिकच्या ‘व्हिसलमॅन’ची प्रेरणादायक गोष्ट!
![Modi's appreciation of Chandrakishore Patil? Inspirational story of 'Whistleman' of Nashik!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Nashik-1.jpg)
नाशिक | प्रतिनिधी
नवरात्रोत्सवात प्रदूषित होणारी नदी सुस्थितीत ठेवण्याचे ‘सीमोल्लंघन’ सहा वर्षांपूर्वी करून नाशिककरांना रस्त्यावर एकटे उभे राहून पर्यावरण रक्षणाचे धडे देण्याचे व्रत चंद्रकिशोर पाटील यांनी आरंभले. न ऐकणाऱ्या नाशिककरांना प्रदूषित पाणी प्राशन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. भविष्यातील धोका पटवून सांगत नासर्डीला नंदिनीमध्ये परिवर्तीत करण्यात पाटील यांनी विशेष योगदान दिले. नंदिनीतिरावर सहा वर्षांपासून प्रदूषणाविरुद्ध लढणाऱ्या ‘व्हिसलमॅन’चे कार्य देशासाठी प्रेरणादायी असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी (दि. २७) ‘मन की बात’मध्ये पाटील यांच्या कार्याचा झालेला सन्मान नदी स्वच्छतेची जबाबदारी अधोरेखित करणारा ठरला.
सण-उत्सवांनंतर निर्माल्य आणि इतर कचऱ्यामुळे प्रदूषित होणाऱ्या नदीचे स्वरुप पालटण्याचा निर्धार सहा वर्षांपूर्वी व्यावसायिक चंद्रकिशोर पाटील यांनी केला. उंटवाडी येथील म्हसोबा महाराज मंदिराशेजारील नंदिनी नदीच्या पुलावर त्यांनी दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत पहारा दिला. तेथे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी नदीच्या दुरवस्थेबद्दल सांगितले. त्यांच्या कार्यातून शेकडो किलो कचरा तेथे संकलित व्हायचा. नागरिकांना सावध करण्यासाठी त्यांनी शिट्टी वाजविण्यास सुरुवात केली. त्यामुळे ‘व्हिसलमॅन’ म्हणून नाशिककरांमध्ये पाटील लोकप्रिय झाले. त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिककरांनी निर्माल्य नदीपात्रात टाकणे बंद केले. त्यांच्या या कार्यामुळे नाशिककर प्रेरीत झाले. त्यामुळे नंदिनी नदीचे सुधारित स्वरुप उंटवाडीजवळ सध्या दिसते. प्रतिवर्षी गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पाटील आपल्या घरात पर्यावरणस्नेही देखावा साकारतात. २०२१ मधील प्रकटदिनानिमित्त त्यांनी ‘विनाशाकडे नेणारा विकास की, शाश्वत विकास’ या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता. त्यांच्या या कार्याची दखल विविध संस्थांनी वेळोवेळी घेतली असून, रविवारी (दि. २७) पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या कार्याचा भाषणात उल्लेख केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले…
‘स्वच्छताग्रहींचा सन्मान करायला हवा. महाराष्ट्रातल्या नाशिकमधील चंद्रकिशोर पाटील यांचा संकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी कित्येक लोकांना प्रेरणा दिली. अनेकांना प्रदूषणापासून रोखले. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत एकट्याने जागृती केली. सातत्याने ही लढाई सुरू ठेवणे विशेष आहे. नंदिनी, गोदावरी नदीच्या रक्षणार्थ त्यांचे कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे’
नाशिककरांकडून कौतुक
चंद्रकिशोर पाटील यांची पंतप्रधानांनी दखल घेतल्याचे समजताच पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांनी त्यांचे अभिनंदन केले. सायंकाळी सहा वाजता उंटवाडी येथील महावटवृक्षाखाली सर्वजण जमले. त्यांनी पाटील यांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली. विविध संस्थांचे प्रतिनिधी, सुजाण नाशिककर उपस्थित होते. आमदार सीमा हिरे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.
लक्षवेधी…
– सन २०२० मध्ये भारतीय वन सेवेतील अधिकारी श्वेता बड्डू यांच्याकडून दखल. त्यांच्या ट्वीटमुळे पाटील यांचे देशभरात
– पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाकडून सोशल मीडियावर पाटील यांच्या कार्याचे कौतुक
– नाशिक सिटिझन्स फोरमतर्फे ‘आउटस्टँडिंग सिटिझन ऑफ नाशिक’ पुरस्कार
– उंटवाडीतील वटवृक्ष वाचविण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग
– ‘नो नायलॉन मांजा’बाबतही प्रबोधनावर भर