आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात, कोणतीही मोठी दुखापत झाली नाही…
![MLA Yogesh Kadam's car accident, no major injury](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Yogesh-Kadam.jpg)
रायगड : दिवसेंदिवस अपघात होण्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे. गेल्या काही दिवसांपासून तर लोकप्रतिनिधींच्या वाहनांना अपघात होण्याच्या दोनचार घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका आमदाराच्या गाडीला अपघात झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने आमदार योगेश कदम यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.
कसा झाला अपघात?
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला आज शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. रूग्णालयात आमदार योगेश कदम जातीने उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली .यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.