चुक दुरुस्त करता येणार, लाडक्या बहिणींसाठी सरकारची घोषणा, e-KYC साठी सर्वात मोठा निर्णय!

Ladki Bahin E-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची सर्वाधिक लोकप्रिय अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र आणि लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. सध्या या योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळाला भेट देऊन केवायसी करता येते. दरम्यान, आता याच ई-केवायसी योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने महिलांना ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे.
गेल्या काही महिन्यात लाखो लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी केलेली आहे. मात्र ही प्रक्रिया पार पाडताना अनेक महिलांनी काही चुका केलेल्या आहेत. काही लाडक्या बहिणींनी चुकीचे ऑप्शन निवडलेले आहेत. त्यामुळे हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने महिलांना केलेल्या ई-केवायसीत दुरुस्ती करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही संधी फक्त एकदाच असेल. त्यानंतर महिलांना ई-केवायसीत कोणताही बदल करता येणार नाही..
हेही वाचा – अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी येणार पुण्यात
सरकारच्या या नव्या निर्णयाबाबत महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे,’ अशी माहिती तटकरे यांनी दिली.
तसेच, पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.




