#MeToo ‘मी टू’चे वादळ कायम
‘मामी’मधून रजत कपूर यांचा ‘कढक’तसेच ‘एआयबी’चा ‘चिंटू का बर्थडे’ नावाचा चित्रपट वगळला
मुंबई : मनोरंजन आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिला सहकाऱ्यांशी लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांना सध्या ‘मी टू मोहिमे’च्या निमित्ताने वाचा फुटत असून या मोहिमेने वादळी रूप धारण केले आहे. अभिनेते आणि निर्माते रजत कपूर आणि एआयबीचे तन्मय भट यांना या आरोपांची किंमत चुकवावी लागली. ‘मुंबई अॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ (मामी) फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजकांकडून रजत कपूर यांचा ‘कढक’ नावाचा चित्रपट तसेच ‘एआयबी’चा ‘चिंटू का बर्थडे’ नावाचा चित्रपट वगळण्यात आला.
महिलांशी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन मामीकडून करण्यात आले. राज्य महिला आयोगानेही अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेले लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांची दखल घेत पाटेकर यांच्यासह सामी सिद्दीकी, गणेश आचार्य आणि राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे. यात त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाबाबत आजपर्यंत कोणती कारवाई केली याचा अहवालही सादर करण्यास सांगितला आहे. याचप्रमाणे ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ला (सिंटा) लैंगिक गैरवर्तनासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर संबंधितांकडून लैंगिक छळाची तक्रार करून आपल्यावर दहा वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर बॉलीवूड आणि प्रसारमाध्यमांतील अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा समाजमाध्यमांवर मांडत आहेत. ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने याची दखल घेत याप्रकरणी पत्रक काढत महिलांवर झालेल्या अन्यायाचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, लेखिका विनता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. यात त्यांनी आलोक नाथ यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता तरी तसे थेट संकेत त्यांनी दिले होते.
विनता यांच्या आरोपांवर आलोक नाथ यांनी असे स्पष्टीकरण दिले की, मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही. मी या विषयावर अधिक बोलणार नाही, कारण तितकाच तो ताणला जाईल, असे ते म्हणाले. ‘तारा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नवनीत निशान यांनीसुद्धा अभिनेते आलोक नाथ यांच्यावर आरोप केले आहेत. ‘तारा’ मालिकेच्या सेटवर ते मला त्रास देत होते. त्यांच्या जाचाला कंटाळून मी त्यांच्या कानशिलात लगावली होती, असे त्या म्हणाल्या. लेखिका, दिग्दर्शिका विनता नंदा यांनी नवनीत यांना दुजोरा दिला आहे. सिंटानेही आलोक नाथ यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.
या प्रकरणाआधी रजत कपूर यांच्यावरही गैरवर्तनाचे आरोप झाले होते. त्यांनी याप्रकरणी समाजमाध्यमांचा आधार घेत माफी मागितली आहे. त्यानंतर ‘स्त्री’ चित्रपटातील अभिनेत्री फ्लोरा सैनी हिनेही निर्माते गौरांग दोशी यांच्यावर मारहाणीचा आरोप करून त्यांनी अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, असे म्हटले आहे.
‘क्वीन’ चित्रपटातील कंगनाची सहकलाकार नयनी हिने निर्माते विकास बहल यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप करत कंगनाच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.
सहकलाकारांचा पाठिंबा
निर्माते महेश भट्ट, तापसी पन्नू सहित काही कलाकारांनी मी टू मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री सोनम कपूरने कंगना राणावतशी झालेल्या शाब्दिक वादावर नमते घेत मी टूच्या मुद्दय़ावर एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे.