संभाजीराजे आणि भुजबळांच्या भेटीने मराठा समाज नाराज, भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
![Maratha community dissatisfied with the meeting of Sambhaji Raje and Bhujbal, demanded clarification of role](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Maratha-community-dissatisfied-with-the-meeting-of-Sambhaji-Raje-and-Bhujbal-demanded-clarification-of-role.jpg)
औरंगाबाद | छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी नाशिकात मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. तर “मी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत”, अशी स्तुतीसुमने सुद्धा संभाजीराजे यांनी भुजबळांवर उधळली. मात्र, त्यानंतर या भेटीवरून मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या संभाजीराजेंनी सरकारच्या आश्वासन देणाऱ्या पत्राचे नाचून स्वागत केलं. पण त्यातील किती मागण्या मान्य झाल्या?, त्यामुळे आता तरी मराठा समाज सावध होईल का?, असं मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक रमेश केरे यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना रमेश केले म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी छगन भुजबळ आहे. त्यामुळे भुजबळ यांची भेट घेऊन संभाजीराजेंना काय साध्य करायचं आहे. ओबीसीमधून हक्काचं आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची भूमिका आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी सुद्धा आता त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करावं. अन्यथा राजेंच्या भूमिकेमुळे समाजामध्ये सुद्धा संभ्रम आहे. तर आजवर मराठा समाजाचा संभाजीराजांवर विश्वास होता, मात्र आता कुणावर विश्वास ठेवावा, असेही केरे म्हणाले.
राजेंनी नाचून स्वागत केलं पण…
पुढे बोलताना केरे म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यासाठी संभाजीराजे आझाद मैदानावर आंदोलनाला बसले होते. त्यानंतर मंत्र्यांकडून त्यांना आश्वासनाचा पत्र देण्यात आलं. विशेष म्हणजे सर्व मागण्या मान्य झाल्या म्हणून, संभाजीराजेंनी नाचून या पत्राचे स्वागत केलं. मात्र प्रत्यक्षात यातील किती मागण्या आज मान्य झाल्या, असा प्रश्न केरे यांनी उपस्थित केला.