“राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीरमध्ये तिरंगा फडकावूनच थांबेल”; मल्लिकार्जुन खरगे
![Mallikarjun Kharge said that Rahul Gandhi's 'Bharat Jodo' tour will stop only after hoisting the tricolor in Kashmir.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/mallikarjun-kharge--780x470.jpg)
महाराष्ट्रात जे सरकार बनले आहे ते चोरांचे सरकार आहे
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसची ताकद दाखवू
मुंबई : ‘भारत जोडो’ यात्रा २४ डिसेंबरला दिल्लीत पोहोचली असून सध्या विश्रांती घेण्यात आली आहे. ३ जानेवारी रोजी काश्मीर गेट येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होणार आहे. . राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये तिरंगा फडकावूनच थांबेल, असं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं आहे.
देशाचे संविधान आणि लोकशाही उद्ध्वस्त करायला निघालेल्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांना रोखले नाही तर हुकूमशाहीचा धोका अटळ आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये तिरंगा फडकावूनच थांबेल, असं खरगे म्हणाले. ते काँग्रेसच्या १३८ व्या स्थापनादिनानिमित्त मुंबई येथील चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर जाहीर सभेत बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खरगे पहिल्यांदाच मुंबईत आले होते. त्यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन करीत काँग्रेसने खरगे यांचे स्वागत करण्यात आले.
काँग्रेसने ७० वर्षांत काय केले असा प्रश्न मोदी विचारतात. मात्र, काँग्रेसने लोकशाही आणि संविधान वाचवल्यानेच तुम्ही पंतप्रधान होऊ शकलात. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ३० लाख जागा रिक्त असताना त्या मोदी सरकार का भरत नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणार जागा भरल्या तर त्या गरिबांना व आरक्षणामुळे मागासवर्गीयांना मिळतील, ते त्यांना नको आहे, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
आमचे आमदार चोरून महाराष्ट्रात जे सरकार बनले आहे ते चोरांचे सरकार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. परंतु. केंद्रातील भाजप सरकारच्या मदतीने, पाठिंब्याने आणि पैशाच्या जोरावर, ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर करून धमक्या देऊन चुकीच्या पद्धतीने शिंदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे, असा आरोप ही खरगे यांनी केला.
सोबतच, मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसला स्वबळावर लढण्याची परवानगी द्या. निवडणूकीत काँग्रेसची ताकद दाखवून देऊ असे भाई जगताप यांनी सांगितले. मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावून दाखवू, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला.